| अलिबाग | वार्ताहर |
आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरम थळ मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन साजरे झाले. कुरुळ येथील आरसीएफ क्रीडा संकुलातील कम्युनिटी हॉल मध्ये आयोजित या कार्यक्रमास 650 सभासद सपत्नीक सहभागी झाले होते. यावेळी आरसीएफ थळ चे कार्यकारी संचालक अनिरुद्ध खाडिलकर, प्रमुख वक्ते प्रसाद कुलकर्णी, फोरमचे अध्यक्ष रवींद्र वर्तक, श्रीनिवास पाटील, विष्णू बापट, शरद देशमुख, रमेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक गौरव करण्यात आला.
खाडिलकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात फोरम करीत असलेल्या कार्याचा खास उल्लेख करून कौतुक केले. तसेच आरसीएफ ची सध्याची जी जोरदार प्रगती चाललेली आहे त्याचे खरे श्रेय निवृत्त कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमासच आहेत असे सांगितले. त्याचबरोबर थळ येथे होऊ घातलेल्या नवीन प्रकल्पाची सुद्धा माहिती सांगितली व यापुढे सुद्धा आरसीएफ ची अशीच जोरदार प्रगती चालू राहील. आपले अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुदगेरीकर यांच्या कुशल व प्रगतिशील नेतृत्वाखाली आरसीएफ उत्तरोत्तर प्रगतीपथावर राहील असे आश्वसित केले.
प्रमुख वक्ते प्रसाद कुलकर्णी यांनी त्यांच्या “आनंद यात्री“ या कार्यक्रमातून आपल्या ओघवत्या आणि विनोद प्रचुर शैलीमध्ये सर्व उपस्थित जेष्ठ नागरिकांना खिळवून ठेवलं. यावेळी सभासदांनी विविध प्रकारचे कलागुण सादर केले. यामध्ये संजय रावळे यांनी स्वागत गीत सादर केले, सुधीर सावंत यांनी पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या कार्यक्रमातील हरी तात्या ही व्यक्तिरेखा सादर केली. काहींनी सुश्राव्य भजन सादर केले तर काहींनी करावके ट्रॅकवर जुनी नवीन गाणी सादर केले आणि या सुमधुर कार्यक्रमाचे विद्याधर पाटील यांनी सूत्रसंचलन करीत उपस्थितांचे मनोरंजन केले. रवींद्र वर्तक यांनी प्रस्तावना केली, शरद देशमुख आणि रमेश म्हात्रे यांनी सूत्रसंचलन केले तर शरद पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.