आ. जयंत पाटील यांचे प्रतिपादन; चार दिवसीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन
| सांगोला | प्रतिनिधी |
सांगोला एक डाव्या आघाडीच्या विचारांची भूमी असून, तो आबासाहेब आणि पवारसाहेबांचा आहे, हे आपल्याला दाखवून द्यायचे आहे, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले. येथील चार दिवसीय कृषी महोत्साचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत आ. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. पवारसाहेब तुम्ही नको त्या लोकांना सांगोल्यात मोठं केलं. त्यांनी आमचा प्रॉब्लेम करून टाकलाय, आता एवढीच विनंती आमच्या लोकांना सोडू नका, आम्ही शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहणार आहोत हे लक्षात असू द्या, सांगोल्यात डॉ. अनिकेत आणि डॉ. बाबासाहेब ही राम-लक्ष्मणाची जोडी आबासाहेबांपेक्षा जास्त परिवर्तन करेल, असा विश्वासही आ. पाटील यांनी दिला.
सांगोला येथे स्व.भाई. गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ डॉ. अनिकेत देशमुख युवा मंचच्या वतीने शुक्रवार 19 ते सोमवार 22 असे चार दिवसीय राज्यस्तरीय गणेशरत्न कृषी महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी खा. पवार बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, आमदार रवींद्र धंगेकर, ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, माजी आ. राम साळे, प्रभाकर चांदणे, तानाजी पाटील, प्रा. लक्ष्मण हाके, श्रीमती रतनकाकी देशमुख, जयमला गायकवाड, चंद्रकांत देशमुख, अभिजीत पाटील, बाळासाहेब एरंडे, अभिषेक कांबळे, डॉ. पियुष साळुंखे, शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख, प्रवीण गायकवाड, दादाशेठ बाबर, विठ्ठलराव शिंदे संयोजक डॉ. अनिकेत देशमुख, सचिन देशमुख, बाळासाहेब काटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील म्हणाले, कृषी प्रदर्शन व्यापक करून सातत्य ठेवा, तरुण या व्यवसायात कसा आकर्षित होईल यासाठी प्रयत्न करावेत. आधुनिक शेतीतून सांगोल्याचा कसा विकास होईल हे करण्याचे काम तुम्ही डॉक्टर बंधूंनी करायचे आहे. सांगोला कोणाचा आहे, सांगोला आबासाहेबांचा आणि पवार साहेबांचा आहे, हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे, असे सांगून पवारसाहेब तुम्ही नको, त्या लोकांना सांगोल्यात मोठं केलं. त्यांनी आमचा प्रॉब्लेम करून टाकलाय, आता एवढीच विनंती आमच्या लोकांना सोडू नका, आम्ही शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहणार आहोत हे लक्षात असू द्या, सांगोल्यात डॉ. अनिकेत आणि डॉ. बाबासाहेब ही राम-लक्ष्मणाची जोडी आबासाहेबांपेक्षा जास्त परिवर्तन करेल, असा विश्वास त्यांनी दिला.
यावेळी कृषी महोत्सवाचे संयोजक डॉ. अनिकेत देशमुख म्हणाले, इथल्या शेतकऱ्यांना मोठ्या शहराच्या ठिकाणी जाऊन कृषी प्रदर्शन पाहता येत नाही म्हणून सत्तेत नसताना कृषी महोत्सवाची संकल्पना घेऊन आयोजित केले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने किसान रेल्वे बंद पडली असताना लोकप्रतिनिधी मात्र पाणी आणल्याचा दिंडोरा पिटवीत असल्याची टीका करून जनता सुज्ञ आहे, स्व. आबासाहेबांनीच शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याचे त्यांनी सांगितले. आज आबासाहेबांमुळे हे व्यासपीठ मिळालं, वरिष्ठांचे अनुभव मार्गदर्शन मिळतायेत, आम्ही दोघेही भाग्यवान आहोत, बाबासाहेबांची पुण्याई कित्येक वर्षे लाभेल, हे आम्हाला सांगता येणार नाही, एवढं काम त्यांनी सांगोला तालुक्यासाठी केले आहे. सांगोल्यातील शेकाप येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी उबाठा शिवसेना प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके, श्री. विठ्ठल सह. साखर का. चेअरमन अभिजीत पाटील, ॲड. सचिन देशमुख यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी सांगोला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचा सत्कार केला. प्रास्ताविक माजी उपसभापती संतोष देवकाते यांनी केले, तर आभार प्रा. हनुमंत कोळवले यांनी मानले.
राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या निमित्ताने यशस्वी शेतकरी नाना माळी (गौडवाडी), यशस्वी पशुपालक बिरा वाघमोडे (सावे), यशस्वी कृषी उद्योजक विवेकानंद घेरडे, यशस्वी शेतकरी कुटुंब प्रमुख नारायण काटकर (वाकी), यशस्वी कृषीपूरक उद्योजक मोहन पवार (वाटंबरे) यांचा खा. शरद पवार, आ.जयंत पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला.
सरकार शेतकरी विरोधी : पवार
आज शेती व्यवसाय अडचणीच्या काळातून जात असताना राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. कांद्याला भाव नाही, साखर निर्यातीचे धोरण चुकीचे आहे, दुधाला अनुदान दिले त्यातही नियम अटी घालून दिल्या, असा शब्दात शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, दुष्काळ असला तरी देशातील सर्वात चांगलं डाळिंब सांगोल्यात पिकते आणि ते देशाच्या कानाकोपऱ्यासह परदेशातही जात आहे. म्हणूनच इथला माणूस स्वाभिमानी, जिद्दी, चिकाटीचा असून, लाचार नाही, ही शिस्त आणि शिकवण गणपतरावांनी समाजातल्या सगळ्या घटकांना घालून दिल्यामुळे आज सांगोल्याचे चित्र बदललेले दिसतंय. गणपतरावांच्या नावाने कृषी प्रदर्शन भरवले त्याबद्दल आयोजकांना खरोखर धन्यवाद देतो. जोपर्यंत तुम्ही डॉक्टर बंधू एकत्र काम करताहेत, तोपर्यंत आम्ही सांगोल्याच्या पाठीशी खंबीर आहोत, असा शब्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगोल्यात कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी दिला.