पुण्याचा बाबुराव चांदेरे फाऊंडेशन संघ विजेता
| मुंबई | प्रतिनिधी |
पुण्याच्या बाबूराव चांदेरे फाऊंडेशन संघाने अमरहिंद मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. या हंगामातील त्यांचे हे राज्यस्तरीय स्पर्धेचे तिसरे जेतेपद. चांदेरे फाऊंडेशनचाच अजित चौहान स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला रोख रू. दहा हजार(10,000/-) व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. दादर, गोखले रोड(प.) येथील मंडळाच्या पटांगणात मॅट वर झालेल्या अंतिम सामन्यात चांदेरे फाऊंडेशनने मुंबईच्या लायन्स स्पोर्टस्चा 42-15 असा लीलया पराभव करीत ‘स्व. उमेश शेणॉय स्मृती चषक’ आणि रोख रू. एकावन्न हजार(51,000/-) आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या लायन्स स्पोर्टस्ला चषक व रोख रू. एकेचाळीस हजार(41,000/-) वर समाधान मानावे लागले.
उपांत्य फेरीत बाबुराव चांदेरे फाऊंडेशनने अंकुर स्पोर्टस्चा 48-34 असा, तर लायन्स स्पोर्टस् क्लबने बंड्या मारुती सेवा मंडळाचा 46-14 असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. उपांत्य उपविजयी दोन्ही संघाना प्रत्येकी चषक आणि रोख रू. पंधरा हजार(15,000/-) प्रदान करण्यात आले. राज आचार्य व बाजीराव होडगे हे लायन्स क्लबचे खेळाडू स्पर्धेतील अनुक्रमे चढाई आणि पकडीचे खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख रू. पाच हजार(5,000/-) व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस वितरण सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष विभागीय आमदार सदा सरवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. तदप्रसंगी श्रीमती उर्मिला शेणॉय, उत्कर्षा तळेकर -(शेणॉय), रवींद्र ढवळे, दत्ता सावंत, तारक राऊळ, मिनानाथ धानजी(दोन्ही शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त), सीमा कोल्हटकर, विजय राणे, साईनाथ काळसेकर(स्पर्धा प्रमुख), स्पर्धा निरीक्षक शरद कालंगण तसेच मंडळाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.