पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पूजा
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अयोध्येत श्रीराम मंदिरात सोमवारी (दि. 22) रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. दरम्यान, मंदिराचे बांधकाम पूर्ण न करता प्रभूरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा, मंदिराचे उद्घाटन करणे हे हिंदू धर्माच्या तत्त्वांचे उल्लंघन आहे. एवढी घाई करण्याची गरज नव्हती, असे शुकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटले आहे. तर, मंदिर वहीं बनायेंगे म्हणणाऱ्यांनी राम मंदिराची जागा का बदलली, असा सवाल करीत शरद पवार यांनी जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविण्याऐवजी भलत्याच प्रश्नांकडे जनतेचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, एकीकडे राजकीय वादात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना, दुसरीकडे मात्र देशभरात हा सोहळा जय श्रीरामाच्या जयघोषात उत्साहात साजरा करण्यात आला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य आणि ऐतिहासिक राम मंदिरात रामलल्लांची विधीवत पूजा करण्यात आली. 500 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर राम मंदिरात रामलल्लांची मूर्ती विराजमान झाली. पूजेवेळी रामलल्लांच्या गर्भगृहात पंतप्रधान मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होत्या.
रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, त्यावेळी हेलिकॉप्टरमधून राम मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाची विधीवत पूजा झाल्यानंतर आरती करण्यात आली. अयोध्यानगरीत भक्तांचा महासागर उसळला होता. महाराष्ट्रातही रामभक्तांनी राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा साजरा केला.
अयोध्येत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रजनीकांत, माधुरी दीक्षित, रणबीर कपूर, आलिया भट यांची उपस्थिती होती. अयोध्येत 25 हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये केंद्रीय पोलिसांचाही समावेश आहे. विमानतळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असणारा मार्ग ‘एसपीजी’च्या निरीक्षणाखाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा पथकाने (एनएसजी) मंदिर परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्था भक्कम असल्याची खात्री केली.
101 किलो सोनं दान सूतरचे हिरे व्यावसायिक असलेल्या लाखी परिवाराकउून राम मंदिरासाठी 101 किलो सोनं अर्पण करण्यात आलं आहे. दिलीप कुमार व्ही लाखी असे त्यांच नाव असून, राम मंदिर ट्रस्टला आतापर्यंत मिळालेलं सर्वात मोठं दान आहे. सध्या सोन्याची किंमत 68 हजार प्रति तोळा इतकी असून, 68 कोटी रुपयांचं हे दान आहे.
देणगीतून मंदिराचे बांधकाम मंदिराच्या बांधकामासाठी देश-विदेशातील रामभक्तांच्या देणगी जमा झाली असून, सरकारचा एकही रुपया खर्च झालेला नाही. आतापर्यंत 5500 कोटी दान मिळाले आहेत. बांधकामासाठी 1800 कोटी रुपये अपेक्षित असून, 1100 कोटींहून अधिक खर्च केले आहेत. 3200 कोटींची देणगी मिळाली आहे.