। अलिबाग । वार्ताहर ।
शैक्षणिक बदलांबाबत व त्याच्या सकारात्मक परिणामाबाबत जागृती होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात ‘स्कूल कनेक्ट’ अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ए.के.आय. उर्दू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोरेगाव येथे कार्यशाळा झाली. कुलगुरू डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रा. प्रशांत आगवणे व प्रा. रवींद्र सोनावणे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 मधील शैक्षणिक बदलांबाबत व त्याच्या सकारात्मक परिणामाबाबत माहिती दिली तसेच, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मोलाचे योगदान देईल, असे मत मांडले. कार्यक्रमात 80 पेक्षा अधिक बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य मुनीर अहमद अल्लाबक्ष तसेच, प्रा. पालावकर तारिक अताउल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.







