नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष
| तळा | वार्ताहर |
तळा शहर आणि तालुक्यात भटक्या कुत्र्यांची समस्या बिकट होत चालली आहे. शहर आणि ग्रामीण भागात कुत्र्यांची संख्या अधिक वाढल्याने रस्त्यावर फिरणे धोक्याचे ठरत आहे. जानेवारी महिन्यात तळा नगरपंचायत हद्दीत एकूण 18 जणांना श्वानदंश झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.वाढलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त आणि निर्बिजीकरण करण्याकडे नगरपंचायत प्रशासन प्रयत्न करीत असलेतरी त्या पर्यटनातून काहीही निष्पन्न झालेले दिसत नाही. ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वेळीच उपचार मिळत असले तरी नागरिकांमध्ये विशेषतः लहान मुलांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत आहे.
तळा हा डोंगराळ व दुर्गम तालुका असल्याने वनपट्टा व जंगली पशूंचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेती व दुग्ध व्यवसाय केला जात असल्याने ग्रामस्थांना सातत्याने शेत व जंगल भागांत वावरावे लागते. याठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर अधिक असतो. हीच स्थिती शहरी भागातही आहे. खाद्याच्या शोधात भटके कुत्रे टोळ्या करून वावरताना दिसतात. रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाणाऱ्यांचा पाठलाग कुत्रे करीत असल्याने तोल जाऊन अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. लहान मुलांनाही भटके कुत्रे लक्ष्य करीत आहेत.
तालुक्यात गेल्या महिन्यात श्वानदंशाच्या 18 घटना घडल्या. यात कुत्रा चावल्याने लहान मुले जखमी झाली होती. शाळेत जाणाऱ्या तसेच मैदानात, घरासमोर खेळणाऱ्या मुलांवर कुत्र्यांची झुंड हल्ला चढवत आहे. इमारती खाली, रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. शहरासह दोन-चार किलोमीटर परिसरातील श्वानदंश झालेले रुग्ण माणगाव उप जिल्हा रुग्णालयात तर प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामीण भागातील रुग्ण उपचार घेत असतात. रुग्ण गंभीर असेल तर त्यालामुंबई किंवा अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात येते.तळ्यामध्ये एक महिन्यांत रस्त्यावर, इमारतीत, बाजारपेठेत भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून निर्बिजीकरण सुरू असले तरी त्यांची संख्या नियंत्रणात आणण्यात नगरपंचायत प्रशासनाला यश आलेले नाही. रात्री अपरात्री घरी परतणाऱ्या नागरिकांवर कुत्र्यांची झुंड हल्ला करीत असल्याच्या घटना घडत आहे.