| रायगड | प्रतिनिधी |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे रविवार (दि.4) रौप्य महोत्सवी क्रीडा महोत्सव-2023 दिवस दुसरा उत्साह पूर्ण खेळीमेळीच्या वातावरणात व अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
यामध्ये कबड्डी खो-खो फुटबॉल व बुद्धिबळ या खेळांचा समावेश असून सोमवारी (दि.5) झालेल्या सामन्यांमध्ये आत्तापर्यंत बुद्धिबळाचे तीन फेर्या पूर्ण असून सर्व स्पर्धक आपापल्या परीने उत्कृष्टपणे खेळ खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच खो-खोच्या स्पर्धेमध्ये काल आणि आजच्या सत्रामध्ये एकत्रित रित्या 36 सामने झाले आहेत. आत्तापर्यंत मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड व नागपूर येथील विद्यापीठांच्या संघांनी आपले वर्चस्व राखले आहे.
या सर्व सामन्यांमध्ये मुले व मुली यांचे सामने अतितटीचे होताना दिसून येत आहेत. तसेच खेळाडूंना प्रेक्षकांचा व परिसरातील नागरिक व विद्यार्थी हे उत्स्फूर्त पाठिंबा देऊन खेळाडूंचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. कबड्डीच्या मुले आणि मुलींचे 30 सामने झाले असून हे सामने कबड्डी मॅटवर खेळविण्यात येत असून दिवस रात्र चालणार्या या रोमहर्षक सामन्यांचा प्रेक्षक मोठ्या संख्येने आनंद घेत आहेत. या क्रीडा महोत्सव मध्ये सुमारे 1 हजार 700 विद्यार्थी व 200 संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक सहभागी झाले असून या सर्वांचे राहण्याची व जेवणाची व्यवस्था विद्यापीठ परिसरामध्ये उत्तम प्रकारे करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कुलगुरू डॉ.कारभारी काळे, कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे क्रीडा समन्वयक डॉ.शिवाजी कराड, डॉ.संजय नालबलवार, प्रा.बालाजी पुलचवाड, प्रा.जाधव, श्री. काळसेकर आणि क्रीडा विभागातील सर्व सह समन्वयक आणि कर्मचारी तसेच तसेच विविध समित्यांचे समन्वयक आणि सदस्य तथा कुलगुरू व कुलसचिव कार्यालयातील सर्व कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.