| पनवेल | वार्तार |
संत शिरोमणी श्री. निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रायगड ठाणे नवी मुंबई वारकरी संप्रदायाच्या वतीने खारघरच्या सेंट्रल मैदानात भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे.
खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला असून यात श्रीमद्भागवत महापुराण कथा वाचन तसेच राष्ट्रीय वारकरी महाअधिवेशन देखील संपन्न होणार आहेत. यावेळी माजी आ. बाळाराम पाटील, बबन पाटील, प्रशांत पाटील, सुदाम पाटील, धनाजी पाटील यांच्या समवेत प्रमुख आयोजक उपस्थित आहेत. 4 ते 12 फेब्रुवारी दरम्यान भक्तिपूर्ण वातावरणात रोज 1 लाख भाविक या सोहळ्यात येणार आहेत. सेंट्रल पार्क मैदानावरती 3000 तंबू उभारलेले असून त्यामध्ये बाहेरून येणाऱ्या भाविकांच्या निवासाची सोय करण्यात आलेली आहे. 5000 टाळकरी, 3000 पखवाज वादक तर 5000 ज्ञानेश्वरी वाचक रोज याठिकाणी असणार आहेत. भाविकांना सोहळ्याचा आनंद घेता यावा व त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आरामशीर बैठक व्यवस्था, मुबलक वाहन पार्किंगची सोय, मुबलक पिण्याचे पाणी, सार्वजनिक शौचालये, प्रथमोपचार अशी जय्यत तयारी आयोजकांनी केलेली आहे. भाविकांना संत दर्शन व्हावे या उद्देशाने अविमुक्तेश्वरानंद सरस्वती, सदानंद सरस्वती, निश्चल आनंद सरस्वती, राजेंद्र दास या प्रभूतींचे आगमन होणार आहे.