फुटबॉल सामन्यादरम्यान रेफ्री दाखवणार नवं कार्ड
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशन बोर्डने सामन्यादरम्यान खेळाडूंना दाखवण्यात येणार्या कार्डचे नियम बदलले आहेत. आता रेफ्री लाल, पिवळ्यासह निळे कार्ड देखील खेळाडूंना दाखवणार आहे. जर एखाद्या खेळाडूने गंभीररित्या फाऊल केला किंवा रेफ्रीच्या निर्णयावर खूप तीव्रपणे नाराजी व्यक्त केली तर हे निळे कार्ड दाखवून खेळाडूला 10 मिनिटासाठी सामन्यातून बाहेर काढण्यात येईल.
नव्या नियमानुसार जर एखाद्या खेळाडूला सामन्यादरम्यान दोन निळे कार्ड दाखवण्यात आले किंवा एक निळे आणि एक पिवळे कार्ड मिळाले तर त्याला मैदानाबाहेर काढण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला फुटबॉल जगतातील मोठ्या स्पर्धांमध्ये अजून हा नवा नियम लागू करण्यात येणार नाहीये. सध्या या नियमाची चाचणी एफए कप आणि महिला एफए कपमध्ये केली जाईल. निळ्या कार्डचा नियम हा सध्या वेल्समधील कनिष्ठ स्तरावरील फुटबॉल स्पर्धांमध्ये वापरण्यात येत आहे. गेल्या वर्षी पोर्तुगालमध्ये झालेल्या महिला डर्बी स्पर्धेत बेनफिका आणि स्पोर्टिंग लिसबोन यांच्यातील सामन्यात रेफ्रींनी पांढरे कार्ड वापरले होते. फिफा वर्ल्डकप 1970 पासून रेफ्रींनी फुटबॉलमध्ये पिवळे आणि लाल कार्ड वापरण्यास सुरूवात केली. त्यानंतर गेल्या वर्षी पांढरे कार्ड वापरण्यात आले.