मोकळ्या भूखंडांवर होणार वृक्ष लागवड
| पनवेल | वार्ताहर |
तळोजा औद्योगिक क्षेत्रात कारखान्यांमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांना दररोज मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी महामंडळानेच आता पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने रात्रीच्या वेळी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे, तसेच प्रदूषण करणाऱ्या कंपन्या पाच तास बंद ठेवण्यात येत असून औद्योगिक क्षेत्रात मोकळ्या भूखंडावर वृक्षलागवड करण्यात येणार आहे.
तळोजा औद्योगिक क्षेत्रात रात्रीच्या वेळी सोडण्यात येणाऱ्या केमिकलमुळे तळोजा, खारघर, रोडपाली, कळंबोली आणि जवळपास असलेल्या गावांना त्रास होत आहे. त्यामुळे विविध सामाजिक संस्थांनी प्रदूषणाविरोधात करण्यासाठी रात्रीच्या वेळी चार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून कं पन्यांतील पाण्याचे नमुने तपासणी केली जात आहे, तसेच प्रदूषण करणाऱ्या कंपन्या रात्रीच्या वेळी पाच तास बंद ठेवणे तसेच काही कंपन्यांकडून प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास येताच तत्काळ नोटीस बजावणे, पर्यावरणाविषयी जनजागृतीसाठी कंपन्यांमध्ये बैठक घेणे, औद्योगिक क्षेत्रातील मोकळ्या भूखंडावर आंबा, फणस, कडुनिंब, चाफा या रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळी पथक तैनात करण्यात आले आहे. मोकळ्या भूखंडावर विविध प्रकारची झाडे लावण्यात येत आहेत. प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी कंपनी ओनर्स असोसिएशनसोबत बैठक घेण्यात येणार आहे.
विक्रांत भालेराव,
क्षेत्रीय अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, तळोजा