। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरूडच्या शिवकालीन पद्मजलदुर्गात सहयाद्री प्रतिष्ठान श्रीवर्धन आणि पुरातत्व खात्यातर्फे अंतर्गत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. याची माहिती अलिबाग-मुरूडचे पुरातत्व खात्याचे आधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली.
काही महिन्यांपूर्वी पुरातत्व विभागातर्फे पद्मजलदुर्गाची स्वच्छता करण्यात आली होती. परंतु, काही भागात साफसफाई बाकी राहीली होती. त्यामुळे रविवारी (दि.25) सकाळी सह्याद्री प्रतिष्ठान श्रीवर्धन आणि पुरातत्व विभागाच्या संयुक्त विद्यमाने वाढलेली झाडे-झुडपे, भिंतीवरील झाडे, पालापाचोळा आदी गोळा करून स्वच्छता करण्यात आली.
सुमारे दोन एकरांवर उभा असलेला पद्मजलदुर्ग शिवकालीन असून आरमारी दृष्टीने त्या काळात महत्वाचा होता. जलदुर्गाचे संपूर्ण नियोजन केंद्र शासनाच्या पुरातत्व खात्याचे अखत्यारीत आहे. इतिहास संशोधक पर्यटक हा जलदुर्ग पाहण्यासाठी खास करून येत असून दिवसेगणिक इतिहास प्रेमी आणि पर्यटकांची संख्या वाढती आहे. तसेच, पुरातत्व खात्याकडून पद्मजलदुर्गाला नवीन दरवाजे बसविण्यात येणार असून तशा प्रकारचा प्रस्ताव मुंबई कार्यालयात पाठविण्यात आल्याचे येलिकर यांनी सांगितले.