| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील एका युवती चित्रकार मानसी प्रकाश सुळे हिने आपल्या कुंचल्याने साकारलेल्या ‘सुखद’ या चित्रांचे चित्र प्रदर्शन मुबंई मधील जहांगीर आर्ट गँलरी शेजारील आर्ट प्लाझा येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून परदेशी प्रेक्षक सुध्दा कौतुक करीत आहेत. मानसीचे हे पहिलेच चित्र प्रदर्शन आहे. हे चित्र प्रदर्शन (दि.10) मार्च पर्यंत पाहण्यास खुले आहे.
कर्जत शहराच्या विठ्ठल नगर विभागात राहणार्या मानसी चे शिक्षण एम कॉम ( ऍडमिनीस्ट्रेशन ) पर्यंत झाले आहे. तिला शालेय जीवनापासूनच चित्रकलेची आवड होती. वेळ मिळेल तेंव्हा कुंचला आणि रंग वापरून विविध चित्रे साकारणे हा तिचा छंद होता. तिने कोणत्याही कला महाविद्यालयात चित्रकला शिकण्यासाठी प्रवेश घेतलेला नाही. तरीही तिने साकारलेली चित्रे एखाद्या प्रसिध्द कलाकाराने रेखाटल्या सारखी वाटत. प्रसिध्द चित्रकार सुनील परदेशी यांच्याशी ओळख झाल्यानंतर तिने त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याचे ठरविले आणि बघता बघता ती एखाद्या निष्णात चित्रकारा प्रमाणे आपल्या कुंचल्याच्या साहाय्याने एका पेक्षा एक चांगली चित्रे काढू लागली.
सुनील परदेशी यांची अनेक चित्र प्रदर्शने मुंबई – पुण्यात आयोजित होत असतात. त्यांनी मानसीला मुंबईत चित्र प्रदर्शन आयोजित करण्यासाठी आग्रह केला. त्याप्रमाणे मानसीने चित्रे साकारण्यास सुरुवात केली. ‘वसंत ऋतू आणि निसर्ग’ हा विषय घेऊन तिने अनेक चित्रे साकारली आणि ‘सुखद’ या चित्र प्रदर्शनाचे आयोजन जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाहेरील आर्ट प्लाझा मध्ये तिचे चित्र प्रदर्शन सुरू झाले असून (दि.10) मार्च पर्यंत ते पहाण्यास खुले आहे.






