सहा गुरांसह 15 कोंबड्या आगीच्या भक्ष्यस्थानी; वाडा चारावैरणीसह जळून खाक
| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील पळचिल ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील उंबरकरवाडी येथे बुधवारी वणव्याचा हाहाकार उडाला. यावेळी सहा गुरे आणि 15 कोंबड्या असलेल्या गुरांच्या गोठ्याला आग लागून संपूर्ण गोठा चारावैरणीसह जळून खाक झाल्याची घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीतून वणव्याच्या आगीचे लोळ पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात येत असून, बुधवारी दुपारी झालेल्या अग्निकांडामध्ये या 21 निष्पाप जीवांचा मृत्यू ओढवला आहे. पळचिल उंबरकरवाडी येथील गरीब शेतकरी बाबाजी धाऊ बर्गे यांच्या गुरांच्या गोठ्याला वणव्यामुळे आग लागली आणि संपूर्ण वाडा जळून खाक झाला. यावेळी वाड्यात बांधलेल्या सहा गुरांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत एक म्हैस, एक रेडा, दोन वासरे, दोन रेडकं अशी एकूण सहा जनावरे आणि 15 कोंबड्या भस्मसात झाल्या. वणव्यामुळे भडकलेल्या आगीमध्ये गुरांच्या वाड्याचे पत्रे, कौले, वासे, गुरांचा चारा असे संपूर्ण जळून खाक झाले. या आगीमुळे बाबाजी धाऊ बर्गे या गरीब शेतकर्याचे अंदाजे तीन लाख 49 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पंचनाम्याअंती प्राप्त झाली आहे.
वणव्यामुळे लागलेल्या आगीची माहिती मिळताच पोलीस पाटील आनंद निविलकर, माजी उपसरपंच उमेश मोरे व ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेऊन वनविभाग तसेच तहसील कार्यालय येथे घटनेची माहिती दिली. तहसील कार्यालयामार्फत तलाठी रितू सुदर्शने आणि कोतवाल अपूर्वा माने यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे. वणव्यामुळे झालेल्या नुकसानीनंतर शासनाकडून त्यांना तातडीची मदत करण्यात यावी, अशी पळचिल पंचक्रोशीमध्ये मागणी होत आहे.