हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत होणार पुलाचे काम
| अलिबाग | प्रतिनिधी |
गेल्या अनेक वर्षापासून आगरदांडा खाडी पुलाची प्रतिक्षा पर्यटकांसह प्रवाशांना लागली होती. अखेर ही प्रतिक्षा आता संपली असून या पुलाचे काम आता लवकरच सुरु होणार आहे. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत पुलाचे काम होणार असल्याने आता दिघीचा प्रवास सुसाट होणार आहे.
आगरदांडा ते दिघीला जाण्यासाठी फेरी बोटीद्वारे जावे लागते. प्रवाशांसह पर्यटकांचा मार्ग सुकर व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आगरदांडा खाडी पुल उभारणीला हिरवा कंदील दाखविला आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बुधवारी 4.3 किमी आगरदांडा खाडी पुलासाठी निविदा उघडली होती. हिंदूस्थान कंस्ट्रक्शन कंपनीने 1187.76 कोटी आणि ॲफकॉन कंपनीने 1249.42 कोटी रुपयांची बोली लावली होती. हिंदुस्थान कंपनीने ॲफकॉन पेक्षा 61.66 कोटी रुपयांनी सर्वात कमी बोली लावली होती. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील टोकेखार, म्हसळा तालुक्यातील तुरुंबडी यांना जोडणारा हा पुल असणार आहे.
जिल्ह्यातील राज्य महामार्ग-4 (रेवस – रेड्डी कोस्टल हायवे) वरील हा दुपदरी पूल महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने जानेवारी 2024 च्या मध्यात बांधकामासाठी मंजूर केला होता. तो अदानी पोर्ट्स आणि दिघी बंदर प्रकल्पाच्या पूर्वेस बांधला जाईल. 809.89 कोटी रुपयांचे कंत्राट असून 30 महिन्यांच्या कालावधीत हे बांधकाम पुर्ण करण्याची मुदत आहे. त्यामध्ये अतिरिक्त दहावर्षे देखभाल दुरुस्तीचा कालावधीत राहणार आहे.
पर्यटन वाढीसाठी पुल ठरणार पर्वणी मुरुडसह, दिघी, दिवेआगर, श्रीवर्धन, म्हसळा, हरिहरेश्वर ही पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची ठिकाणे आहेत. वर्षाला दोन लाखाहून अधिक पर्यटक या ठिकाणी फिरण्यास जातात. येथील समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळांचा आनंद पर्यटक मनमुरादपणे घेतात. पावसाळ्यामध्ये या भागात असलेले धबधबे पर्यटकांना कायमच आकर्षित करीत आली आहेत. आगरदांडा खाडी पुल येथील पर्यटन वाढीसाठी एक पर्वणी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.






