| पुणे | वृत्तसंस्था |
पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात असणाऱ्या तळवडे येथील येवले चहाच्या दुकानात सोमवारी (दि.11) दुपारच्या सुमारास फ्रीजच्या विजेच्या धक्क्याने एका 17 वर्षीय बालकामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळवडे परिसरात गणेश जगताप यांचे येवले चहा नावाने दुकान आहे. यांनी आपल्या दुकानात मुलाचे वय माहिती असून देखील त्याला आपल्या दुकानात कामाला ठेवले होते. दुकानामध्ये असलेल्या फ्रिजमध्ये विजेचे करंट उतरलेले होते. मयत मुलाने त्या फ्रीजला हात लावताच तो करंट त्या मुलाच्या शरीरात उतरला. या दुकान मालकाने कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणातीही उपाययोजना केलेली नव्हती. याशिवाय तिथे काम करणाऱ्या कामगारांनी या फ्रिजमध्ये करंट लागण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, मालकाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. मालकाने फ्रिजवरून त्या बालकामगाराला कप काढण्यास सांगितले. त्यामुळे त्याला फ्रिजचा जोरात विजेचा धक्का बसला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे गणेश जगताप याच्यावर बालकामगार सुधारीत अधिनियम अतंर्गत गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक गणेश खारगे पुढील तपास करत आहेत.






