| रायगड | प्रतिनिधी |
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेशांसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने किमान आणि कमाल वयोमर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार पूर्वप्राथमिक प्रवेशासाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत किमान तीन वर्षे, तर कमाल चार वर्ष पाच महिने, तर पहिलीसाठी सात वर्ष पाच महिने अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
खेळगट, बालवाडी, पहिली अशा विविध स्तरावर विद्यार्थ्यांचे प्रवेश होतात. मात्र प्रवेशासाठीच्या वय निश्चितीबाबत पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने या पूर्वी ‘आरटीई’ प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शाळेत प्रवेश घेण्यासाठी बालकांचे किमान वय किती असावे, हे यापूर्वीच निश्चित केले आहे. मात्र आता किमान आणि कमाल अशी दोन्ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या आरटीई 25% प्रवेशासाठी वयोमर्यादा 31 डिसेंबर 2024 रोजी किती असावी, हे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे.
आता खेळगटासाठी किमान वय तीन वर्षे पूर्ण आणि 31 डिसेंबर 2024 पर्यंत चार वर्ष पाच महिने पूर्ण अशी कमाल मर्यादा असणार आहे. तर पहिलीसाठी किमान सहा वर्षे पूर्ण आणि कमाल सात वर्ष पाच महिने अशी वयोमर्यादा असेल, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.