महानगरपालिकेने संवर्धनाचे काम घेतले हाती
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या ऐतिहासिक तोफांचे नवीन झळाळी मिळणार आहे. या आठ तोफांचे तंत्रशुद्ध पद्धतीने जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने हे काम हाती घेण्यात आले असून, आठवडाभरात हे काम पूर्ण होणार आहे.
पनवेलमधील ऐतिहासिक बंदरात या तोफा ठेवलेल्या होत्या. त्यानंतर काही इतिहास संशोधकांनी त्यांचा शोध लावल्यानंतर या शिवकालीन तोफांचे मानाचे स्थान म्हणून पनवेल नगरपरिषदेच्या मुख्य इमारतीत ठेवण्यात आले. कालांतराने पालिका स्थापन झाली असली तरी तोफांचे स्थान कायम ठेवण्यात आले. मात्र, शेकडो वर्षांच्या या तोफांना गंज चढल्याने या तोफांच्या संवर्धनासाठी तज्ज्ञांची सल्लामसलत करून आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ, उपायुक्त पवार यांनी याबाबत या तोफांना नवीन झळाळी देण्याचे काम हाती घेतले. यापूर्वी या तोफांची दोन वर्षांपूर्वी रासायनिक प्रक्रिया पूर्ण केली होती. या तोफांना नवे लूक प्राप्त होणार आहे.
याकरिता गड किल्ल्याचे अभ्यासक व पुरातत्वज्ज्ञ सागर मुंढे, भाग्यश्री मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या तोफांचे संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. पुरातत्वचे विद्यार्थ्यांना संधी म्हणून या प्रकल्पात सामावून घेण्यात आले आहे. यामध्ये मुंबई विद्यपीठातील पुरातत्व विषयाचे मास्टर्सचे विद्यार्थी निकुंज मांढरे, मधुरा सावंत, मयुरी पवार, रसपाल सिंग रंधावा या विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप म्हणून सहभाग घेतला. सदर तोफांचे जतन आणि संवर्धन कार्य पुढील आठ ते नऊ दिवस चालू राहील. त्यानंतर तोफांना पारंपरिक लाकडी तोफगाडे बसविण्यात येणार असल्याचे सागर मुंढे यांनी सांगितले. लवकरच पनवेल महानगरपालिका परिसरातील तोफा लाकडी तोफगाड्यावर बसविण्यात येणार असून, त्याचे ऐतिहासिक महत्त्व वाढणार असल्याचे सागर मुंढे यांनी सांगितले.
ऐतिहासिक वारसा जतन करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. या दृष्टीने या ऐतिहासिक तोफांचे संवर्धन व जतन करण्याचे काम सुरु आहे. या तोफांना नवी झळाळी मिळाल्यावर निश्चितच या तोफांना त्यांचे मूळ स्वरूप प्राप्त होणार आहे.
सचिन पवार,
उपायुक्त, पनवेल महानगरपालिका