महाराष्ट्राची बाद फेरीत धडक
| मुंबई | वृत्तसंस्था |
महाराष्ट्राच्या मुलांनी साखळी सामन्यात सलग दोन विजय मिळवीत “33व्या किशोर गट राष्ट्रीय कबड्डी“ स्पर्धेच्या बाद फेरीत धडक दिली. मोतीहारी, बिहार येथे दिनांक 16 मार्च पासून सुरू झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत शनिवारी (दि. 16) रात्री उशीरा झालेल्या क गटात महाराष्ट्राने प्रथम गुजरातला 41-24 असे पराभूत करीत विजयी सलामी दिली. विश्रांतीला 21-14 अशी छोटी आघाडी घेणार्या महाराष्ट्राने विश्रांतीनंतर आपला खेळ थोडा गतिमान करीत 17 गुणांच्या फरकाने सामना खिशात टाकला. संघनायक सोपान पुणेकरच्या झंझावाती चढाया त्याला रवींद्र माने याची पकडीची मिळालेली भक्कम साथ यामुळे हा विजय शक्य झाला.
रविवारी (दि.17) सकाळी झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने दुबळ्या त्रिपुराला 27-04 असे सहज नमवित बाद फेरी गाठली. महाराष्ट्राच्या या क गटात फक्त 3 संघाचा समावेश होता. पहिल्या डावात 15-01अशी भक्कम आघाडी घेणार्या महाराष्ट्राने दुसर्या डावात सावध खेळ करीत आपला विजय सोपा केला. अथर्व सोनावणे याच्या दमदार चढाया, सूरज झगडेचा भक्कम बचाव यामुळे हे शक्य झाले. उप उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राची गाठ आता फ गटातील उपविजेत्या संघाशी पडेल.