। अलिबाग । प्रतिनिधी ।
भाड्याने दुचाकी देण्याचा व्यवसाय बेकायदेशीर असतानादेखील तो अलिबागमध्ये खुलेआमपणे सुरु आहे. त्यामुळे रिक्षा व्यवसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांच्याविरोधात रिक्षा चालक आक्रमक झाले असून त्यांनी या व्यवसायाविरोधात पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भाड्याने दिलेल्या पाच दुचाकी अलिबागच्या रिक्षा चालक, मालकांनी अलिबाग पोलीसांच्या ताब्यात दिल्या आहे. यावर पोलीस काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
अलिबागसह अनेक ठिकाणी शहरात दुचाकी भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरु आहे. या व्यवसायाला उपप्रादेशिक परिवहन विभागाने बेकायदेशीरचा शिक्का मोर्तब केला आहे. तरीदेखील हा व्यवसाय अलिबागसह अनेक भागात राजरोसपणे चालविला जात आहे. हा व्यवसाय चालविणार्या चालकांविरोधात उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करीत नोटीस देखील बजावली आहे. तरीसुध्दा हा व्यवसाय खुलेआमपणे सुरु ठेवला जात आहे. दुचाकी भाड्याने देण्याच्या व्यवसायामुळे स्थानिक रिक्षा व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.त्यामुळे उपासमारीची वेळ येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. दुचाकी भाड्याने देण्याचा व्यवसाय बंद करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात आहे. मात्र त्यांच्याविरोधात ठोस कारवाई केली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अलिबागच्या रिक्षा चालकांनी अखेर आक्रमक भुमिका घेत भाड्याच्या दुचाकी पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याची मोहिम हाती घेतली आहे. मागील दोन महिन्यापूर्वी चार दुचाकी पोलिसांच्या ताब्यात दिली होती. आता पुन्हा सोमवारी (दि.18) पाच दुचाकी अलिबाग पोलीसांच्या ताब्यात पकडून दिल्या आहेत.
दुचाकी भाड्याने चालविणे बेकायदेशीर आहे. हा व्यवसाय करणार्यांन यापुर्वी परवानगी घेऊन दुचाकी भाड्याने देण्याच्या सुचना केल्या होत्या. मात्र तरीदेखील कोणतीही परवानागी न घेता तो व्यवसाय सुरु ठेवला. रिक्षा व्यवसायिकांवर त्याचा परिणाम होत आहे. सोमवारी रिक्षा चालकांनी पाच दुचाकी पकडून पोलिस ठाण्यात आणल्या. त्या जप्त केल्या आहेत. उपप्रादेशिक परिवहन विभागाला याबाबत पत्र व्यवहार केला असून त्यांच्याकडून पुढील कारवाई केली जाणार आहे.
संजय पाटील, पोलीस निरीक्षक, अलिबाग