उदय देवरे यांची सुवर्ण कामगिरी
| पाली/गोमाशी | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने “महाराष्ट्र श्री’’ ही अजिंक्यपद राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा दिनांक 10 मार्च 2024 मुंबई, अंधेरी शहाजीराजे क्रीडा संकुल येथे आदरणीय डॉ. संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा संघटनांतील मोठ्या संख्येने 300 खेळाडू या स्पर्धेमधे सहभागी झाले. या स्पर्धेत 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 90 व 95 किलोवरील वजनी गटातील विविध जिल्ह्यातील बॉडीबिल्डर्सना खेळण्याची संधी मिळाली. या स्पर्धेमधे रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व रोहा तालुक्यातील चिकणी या गावामधील 75 किलो वजनी गटात उदय राजाराम देवरे या बॉडीबिल्डरने केले. या स्पर्धेमधे उदय देवरे यांनी 75 किलो गटात सुवर्ण पदकाला गवसणी घातली व महाराष्ट्र श्री किताब विजेतेपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये स्पर्धेचे द्वितीय उपविजेतेपद मिळवले. या मिळालेल्या यशानंतर जिल्ह्यातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
उदय देवरे हे एका खाजगी कंपनीमध्ये काम करतात. बॉडीबिल्डिंग या क्षेत्रामध्ये त्यांना कुटुंबाकडून, मित्रपरिवारकडून, कंपनीकडून मिळणारा सपोर्ट व रायगड जिल्हा जनरल सेक्रेटरी दिनेश शेळके यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन त्यांच्या यशामागचे कारण आहे. पुढील महिन्यामध्ये होणार्या “भारत श्री’’ या राष्ट्रीय स्पर्धेमधे रायगड जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे, त्यांना या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा.