मोदी सरकारला धक्का देण्याची तयारी
| रायगड | आविष्कार देसाई |
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणूक लढवत असले, तरी जातीचा फॅक्टर हा अतिशय महत्त्वाचा ठरतो. रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ओबीसी मतदारांचे प्राबल्य आहे. त्यानंतर मराठा, एसटी, मुस्लीम, एससी आणि अन्य जाती-धर्मातील मतदारांचा समावेश होतो. मात्र, या सर्व जात घटकातील बहुतांश मतदार हे केंद्र सरकारच्या आजवरच्या धोरणांवर नाराज असल्याचे चित्र आहे. ओबीसी-मराठा समाजात सरकारने आरक्षणावरुन भांडणे लावल्याने हे सर्व जाती-धर्माचे मतदार कोणाच्या पाठीशी उभे राहणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
देशात 2014 आणि 2019 साली झालेली लोकसभेची निवडणूकही खऱ्याअर्थाने जाती-धर्माच्या नावावरच भाजपाने लढली होती. असे असताना रायगड लोकसभेत मात्र मोदींच्या लाटेचा असर काही दिसून आलेला नाही. रायगडातील मतदारांनी अशा लाटांना कधीच खतपाणी घातले नाही, हा इतिहास आहे. ओबीसी, मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे बॅ. ए.आर. अंतुले या मुस्लिम समाजातील व्यक्तीला निवडून दिले आहे. अंतुले यांनी 1989, 1991, 1996 आणि 2004 या कालावधीत झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.
1952-2019 सालापर्यंत सर्व जाती-धर्मातील उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीत नशीब अजमावले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अधिकांशपणे ओबीसी समाजातील उमेदवार विजयी झालेला आहे. सर्वच समाजाची मते ही दोन्ही प्रमुख उमेदवारांना मिळत आली आहेत. देशामध्ये सध्या जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करुन मतांचे विभाजन करण्याचा डाव आखला जात आहे. हे काही आता लपून राहिलेले नाही. रायगडातील मतदारांनी असल्या प्रकारांना कधीच थारा दिलेला नाही.
रायगड लोकसभेत ओबीसी आणि मराठा समाजाची ताकद फार मोठी आहे. परंतु, मराठा आरक्षण प्रश्नावरुन शिंदे-भाजपा-अजित पवार सरकारवर मराठा समाजाची फार नाराजी आहे. राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मराठा समाज पुरस्कृत एक अपक्ष उमेदवार उभा राहू शकतो. विशेष म्हणजे, हा उमेदवार मराठा, धनगर, मुस्लिम, दलित या समाजाचाही असू शकतो. 30 मार्चपर्यंत गावागावात बैठका घेऊन याबाबतचा डेटा आल्यावर प्रचाराला जायचे की नाही हे ठरवू, असे मनोज जरांगेंनी सांगितले आहे.
मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आतील आरक्षण दिले नाही. सरकार आपल्या शब्दाला जागले नाही. त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे, असे मराठा क्रांती मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष विनोद साबळे यांनी ‘कृषीवल’शी बोलताना सांगितले. इंडिया आघाडीने रायगड लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची उमेदवारी घोषित केली आहे. गीतेंसमोर महायुतीचा कोण प्रतिस्पर्धी असेल याबाबत स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
एसटी, मुस्लीम, एससी आणि अन्य जाती-धर्मातील मतदारांची भूमिकादेखील या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. सध्या केंद्र सरकाने पारीत केलेल्या विविध कायद्यांमुळे या समाजामध्ये तिरस्काराची धारणा आहे. मध्यंतरी शिवसेनचे प्रमुख उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी कडवट हिंदुत्वाला दूर सारत राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व असे अधोरेखित केले होते. त्यामुळे येथील सभांना मुस्लिम समाजातील नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे भाजपाला या समाजाची नाराजी निश्चित परवडणारी नाही, असे सध्या तरी दिसून येते.
रायगड जिल्ह्यात तब्बल 23 लाख 16 हजार 515 मतदार आहेत. तसेच जातीचे समीकरण असे गृहीत धरल्यास मतदारांचा प्रत्येक जातींमध्ये किती वाटा आहे हे स्पष्ट होते.
ओबीसी 52 टक्के मतांचा वाटा (12,04,587)
मराठा 20 टक्के (4,63,303)
एसी 5 टक्के (1,15,825)
एसटी 12 टक्के (2,77,981)
मुस्लीम 10 टक्के (2,31,651)
इतर (ब्राम्हण, जैन, गुजराती, शीख, पारसी) 1 टक्का (23,165)







