अक्षया प्रशांत नाईक यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ
| अलिबाग | प्रतिनिधी |
गोविंदबंदर येथील नालंदा बुध्दविहार आयोजित मिलींद जाधव, मनिंदर बाडवाल, कपिल गायकवाड यांच्या वतीने अलिबाग शहरातील क्रिडा भवनच्या प्रांगणात दोन दिवस क्रीकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ अक्षय्या प्रशांत नाईक व अलिबागच्या माजी नगरसेविका संजना किर यांच्या हस्ते शनिवारी (दि.30) मार्च रोजी करण्यात आला.

गेल्या दोन वर्षापासून मिलींद जाधव, मनिंदर बाडवाल, कपिल गायकवाड यांच्या पुढाकाराने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक स्पर्धेची परंपरा जपली आहे. शनिवारपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत 16 संघ सहभागी झाले आहेत. अलिबाग तालुक्यातील ग्रामीण शहरी भागातील संघाचा यामध्ये समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी (दि.31) मार्च रोजी सायंकाळी होणार आहे. त्यानंतर अंतिम विजेत्या संघाला गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला रोख 51 हजार रुपये चषक, द्वीतीय क्रमांकाला 31 हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व सामनवीराला आकर्षक बक्षीस देऊन गौरविले जाणार आहे. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत ही स्पर्धा आयोजित केली असून ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी क्रीडा भवन समोर गर्दी केली आहे. स्पर्धेला पहिल्या दिवसापासून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.
यावेळी विकास दामले, विजय पाटील, समिर जाधव, मिलींद जाधव, मनींदर बाडवाल, कपिल गायकवाड आदी मान्यवर, खेळाडू, क्रिकेट प्रेमी व प्रेक्षक उपस्थित होते.






