। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्राच्या दोन्ही (पुरुष व महिला) खो-खो संघांचा झंझावात रविवारीही कायम राहिला. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने दिल्लीवर, तर महिला संघाने पंजाबवर विजय मिळवत राष्ट्रीय खो-खो स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांसमोर पश्चिम बंगालचे आव्हान असणार आहे. नवी दिल्ली येथे देशातील प्रतिष्ठेची खो-खो स्पर्धा सुरू आहे.
महाराष्ट्राच्या महिलांनी पंजाबचा (24-10) एक डाव 14 गुणांनी पराभव केला. महाराष्ट्रातर्फे अश्विनी शिंदे (3.20 मि. संरक्षण व 6 गुण), रेश्मा राठोड (3.10 मि. संरक्षण व 6 गुण), प्रियांका इंगळे (2.30 मि. संरक्षण व 8 गुण), काजल भोर (3.10 मि. संरक्षण व 2 गुण), कोमल धारवटकर (3.20 मि. संरक्षण) यांनी धडाकेबाज खेळ केला. पंजाबकडून नीता देवीने (1.40, 1.30 मि. संरक्षण) एकाकी लढत दिली. तिला उर्वरित खेळाडूंकडून योग्य साथ मिळाली नाही.
पुरूष विभागात महाराष्ट्राने यजमान दिल्लीचा 28-26 असा 2 गुण व जवळजवळ साडेचार मिनिटांपेक्षा जास्त वेळ राखून पराभव केला. महाराष्ट्राच्या विजयात वृषभ वाघ (1.40, 1.20 मि. संरक्षण), लक्ष्मण गवस (1.40, 1.30 मि. संरक्षण व 6 गुण), प्रतीक मोरे (1.40 मि. संरक्षण व 6 गुण), राहुल मंडल (1.10 मि. संरक्षण व 4 गुण) यांनी शानदार खेळ करत मोलाचा वाटा उचलला. दिल्लीकडून अजय कुमार (1.10 मि. संरक्षण व 4 गुण), मेहूल (1.40 मि. संरक्षण व 2 गुण) यांनी चांगला खेळ केला.