आग आटोक्यात आल्याने अनर्थ टळला
| चिरनेर | वार्ताहर |
जेएनपीए बंदरात एक्सपोर्ट करण्याच्या तयारीत असलेल्या एका ज्वलनशील पदार्थ वाहून नेणार्या कंटेनरला सोमवारी (दि.1) पहाटे सुमारास भीषण आग लागली. जेएनपीएच्या अग्नीशमन दलाच्या जवानांनी शर्थीच्या प्रयत्नातून शिताफीने आग आटोक्यात आणल्याने बंदराच्या प्रवेशद्वारावरच स्फोटसदृश परिस्थिती टळली. पुढील अनर्थ टळला असला तरी वाहतूकदार कंपनीच्या बेफिकीरीपणामुळेच ही घटना घडल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबत तातडीने कारवाईची करण्याबाबत जेएनपीए प्रशासनाला कळविण्यात आले आहे.
जेएनपीए बंदरातुन हायड्रोजन पेट्रोलियम अतिज्वलनशील पदार्थ क्र.एमएम-46 -बीएम 5639 या ट्रेलर मधुन 20 फुटी दोन कंटेनरमधुन यांची वाहतूक केली जात होती. अति ज्वलनशील पदार्थांचे भरलेले ड्रम घेऊन कंटेनर ट्रेलरने जेएनपीए बंदराच्या सेंट्रल गेटमधून आत प्रवेश करुन 100 मीटर अंतरावर गेलेल्या अति ज्वलनशील पदार्थ वाहून नेणार्या कंटेनरने अचानक पेट घेतला. आग लागल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर वाहनचालकाने पेटलेल्या ज्वलनशील कंटेनरसह ट्रेलर बंदराच्या प्रवेशव्दारा बाहेर काढले. आगीची माहिती मिळताच जेएनपीएच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटना स्थळी धाव घेतली.तोपर्यत ज्वलनशील पदार्थ असलेला कंटेनर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या कंटेनरमधुन ज्वलनशील पदार्थांचे ड्रम धडामधूम आवाज करीत फुटू लागल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. जेएनपीएच्या अग्नीशमन दलाच्या जवानांनी शर्थीच्या प्रयत्नातून फोम, पाण्याचा मारा करून मोठ्या शिताफीने आग आटोक्यात आणली. यामुळे बंदराच्या प्रवेशद्वारावरच स्फोट सदृश परिस्थिती टळली.