मंत्री आदिती तटकरेंच्या उपस्थितीत कार्यकर्ते आक्रमक
। रायगड । आविष्कार देसाई ।
लोकसभेचा हट्ट सोडल्यानंतर भाजपा आता पूर्ण जोशात आली आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे यांना निवडून आणण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी बलिदान देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे तटकरेंनी भविष्यात भाजपाला विसरु नये अन्यथा गाठ आमच्याशी आहे, अशा आविर्भावात भाजपाच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी तटकरेंचे कान टोचल्याचे दिसून आले.
अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी सभागृहात भाजपाची बुथ कार्यकर्ता, सुपर वॉरियर्स संमेलन आणि निवडणूक नियोजन बैठक पार पडली. त्यावेळी भाजपाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी तटकरे यांना निशाण्यावर घेतल्याचे दिसून आले. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तटकरेंच्या हेतूवर शंका उपस्थित केली. विशेष म्हणजे, यावेळी व्यासपीठावर मंत्री आदिती तटकरेदेखील उपस्थित होत्या. आतापर्यंत सुनील तटकरे यांनी बहुतांश पक्षांच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना फसवले आहे. त्यामुळेच आम्हाला स्पष्ट आणि विश्वासार्ह आश्वासन पाहिजे आहे, असा सूर भाजपाच्या कार्यकर्त्यांचा असल्याचे दिसून आले.
गेल्या एक वर्षाहून अधिक कालावधीत भाजपाने रायगड लोकसभा मतदारसंघ बांधायला घेतला आहे. रायगडची जागा आपल्यालाच लढवण्यासाठी मिळेल, असा विश्वास भाजपाला होता. मात्र, या जागेवर सुनील तटकरे यांचा हक्क होता, त्यानुसार त्यांच्याकडे जागा गेली. त्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज झाले होते. याच कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न भाजपाने सुरु केले आहेत. मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी सुनील तटकरे यांना निवडून आणा, असे कार्यकर्त्यांवर बिंबवण्याची वेळ आता भाजपाच्या नेत्यांवर आली आहे. यासाठी त्यांनी आगामी कालावधीत रायगड लोकसभा मतदारसंघात असे कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने भाजपाचे पेणचे आमदार रवींद्र पाटील, लोकसभा अध्यक्ष सतीश धारप, सरचिटणीस ॲड. महेश मोहिते, गीता पालरेचा, राजेश मपारा, गिरीश तुळपुळे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश होता.
पक्षविरहित राजकारण हवे बलिदान देऊन सुनील तटकरेंना निवडून आणण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते प्रयत्न करत असतील, तर सुनील तटकरे, आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांचे कर्तव्य आणि प्रतिबध्दता असली पाहिजे की, भाजपा कार्यकर्त्यांच्या विकासकामांना प्राधान्य दिले पाहिजे. त्यावेळी पक्षविरहीत राजकारण त्यांनी केले पाहिजे. ही तुमची जबाबदारी आहे, असे सतीश धारप यांनी मंत्री आदिती तटकरे यांना सुनावले.
घटक पक्षाला समान न्याय महायुतीमधील प्रत्येक घटक पक्षाला समान न्याय सुनील तटकरे यांच्याकडून मिळेल याची मी हमी घेते, असा विश्वास आदिती तटकरे यांनी यावेळी बोलून दाखवला. महायुतीचे खासदार म्हणूनच ते काम करतील. जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.