| पुणे | वृत्तसंस्था |
पुण्यातील वार्जे भागामध्ये गुरुवारी (दि. ४) रात्री 9:48 वाजता एक भीषण अपघात घडला. पुणे-बाहुली मार्गावर एनडीएच्या कोंडावे गेटजवळ एका भरधाव कारने दोन तरुणांना जोरदार धडक दिली. ही धडक इतक्या जोरात बसली की हे दोघेही काही फुटांपर्यंत उडाले. पिकॉक हॉटेलसमोर झालेल्या या भीषण अपघातामध्ये रस्त्याच्या बाजूने चालणारे दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. दोन्ही जखमी व्यक्तींची ओळख पटू शकलेली नाही. या अपघाताचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे कारने धडक देत दोघांना उडवल्यानंतरही ही कार थांबली नाही. त्याच वेगात कार पुढे निघून गेल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे. या प्रकरणामध्ये उत्तम नगर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेल्या व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला असून बेदरकारपणे कार चालवत या अपघाताला कारणीभूत असलेल्या चालकाचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणामध्ये हीट अँड रनचा गुन्हा दाखल करुन घेण्यात आला आहे.