भाजपा जिल्हाध्यक्ष अनुपस्थित, शिंदे गटाचे दबावतंत्र सुरु
| रायगड | आविष्कार देसाई |
लोकसभा निवडणूक प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी सर्व घटक पक्षांनी प्रचाराचे मैदान मारले आहे. दुसरीकडे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या घटक पक्षातील प्रमुख असणारा भाजपा आणि शिंदे गटाने प्रचारातून अंग काढून घेतल्याचे चित्र आहे. उमेदवारी न मिळाल्याने भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाराज आहेत, तर शिंदे गटाला राज्यात अपेक्षीत जागा मिळत नसल्याने दबाव टाकण्यासाठी प्रचारातून दुर राहण्याच्या सूचना दिल्याची रायगड लोकसभा मतदार संघात जोरदार चर्चा आहे.
रायगड लोकसभा निवडणुकीत (दि.12) एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून (दि.19) एप्रिल अंतिम मुदत आहे. (दि.20) एप्रिलला उमेजवारी अर्जाची छाननी होणार आहे. उमेदवारी माघार घेण्याची शेवटची तारीख (दि.22) एप्रिल आहे. (दि.7) मे रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे. (दि.7) जूनला मतमोजणी होणार आहे. त्यानुसार निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. इंडिया आघाडीत शिवसेनेचे अनंत गीते यांनी प्रचाराचे रान उठवले आहे. त्यांच्या प्रचारासाठी घटक पक्षातील सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहात असल्याचे दिसून येते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशिल पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक होते, मात्र त्यांचे लोकसभेचे तिकीट हुकल्याने ते आणि त्यांचे समर्थक प्रचंड नाराज असल्याचे बोलले जाते. सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी भाजपाने मतदार संघात मेळावे आयोजित करुन आम्ही युती धर्म पाळत असल्याचा संदेश देण्याचा खटाटोप सुरु केलो आहे. आतापर्यंत झालेल्या मेळाव्यात धैर्यशिल पाटील यांची अनुपस्थिती खटकणारी ठरत आहे. दुसरीकडे शिंदे गटाला राज्यात अपेक्षित जागा मिळेनाशा झाल्या आहेत. उलट शिंदे गटातील विद्यमान खासदांराचे तिकीट कापण्याचा सपाटा भाजपाने अवलंबला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे बोलले जाते. महायुतीमध्ये दबाव निर्माण करण्यासाठी प्रचारापासून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दूर राहण्याच्या सूचना दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांची डोकेदुखी वाढल्याचे दिसून येते. महायुतीमधील नाराजी नाट्य हे रायगडातील मतदारांमध्ये पोचत असल्याने तटकरेंसाठी हे नक्कीच परवडणार नाही. त्याचा जबरदस्त फटका हा तटकरेंना बसू शकतो. अनंत गीते हे इंडिया आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाला सोबत घेऊन मतदारांपर्यंत पोहचत आहेत. संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीच्या गीते यांना मतदान करा, असे आवाहन विविध सभेमधून करण्यात येत असून त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.