बोर्लीमध्ये इंडिया आघाडीची जनसंवाद सभा उत्साहात
| कोर्लई | राजीव नेवासेकर |
आगामी लोकसभा निवडणुकीत फितुरांना, गद्दारांना टकमक टोक दाखवा आणि तटकरेंना शंभर टक्के हद्दपार करा, असे आवाहन इंडिया आघाडीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनंत गीते यांनी मुरुड तालुक्यातील बोर्ली येथे आयोजित जनसंवाद सभेत केले. लोकसभेच्या मागील झालेल्या निवडणुकीत तटकरेंना हद्दपार केलं होतं, पण शेकापमुळे वाचले होते. गेल्या निवडणुकीमध्ये आमचे शिवसैनिक नौशाद दळवी माझा प्रचार करत होते, ते मुस्लिम बांधवांना सांगत होते, असा निष्कलंक नेता सापडणार नाही, गीतेंनाच मतदान करा; परंतु विरोधकांनी त्याच ठिकाणी जाऊन सांगितले, गीतेंना मत म्हणजेच मोदींना मत; पण आज काय झाले आहे, जे हे सांगत होते तेच मोदींच्या मांडीवर जाऊन बसले. ज्याची हद्दपारी मधुशेठ ठाकूर यांनी वाचवली, त्या आमदार मधुशेठ ठाकूर यांच्या पाठीत खंजीर खुपसला. जे अंतुले साहेबांचे, जे मधुशेठ ठाकूर, जे पवार साहेबांचे, जे आ. जयंत पाटील यांचे नाही झाले, ते तुमचे काय होतील. अशी तोफ डागत अनंत गीते यांनी आगामी होणार्या लोकसभा निवडणुकीत 7 मे रोजी इंडिया आघाडीच्या मशाल चिन्हासमोरील बटण दाबून निवडून देण्याचे आवाहन यावेळी केले.
यावेळी शेकापचे माजी आमदार पंडित पाटील, चित्रलेखा पाटील, काँग्रेसचे कॉ.म.प्र.सं. प्रवीण ठाकूर, राजा ठाकूर, श्रद्धा ठाकूर, सुभाष महाडिक, वासंती उंमरोटकर, शि.उप.जि.प्र. सुरेंद्र म्हात्रे, प्रशांत मिसाळ, तालुका प्रमुख नौशाद दळवी, राजेश्री मिसाळ, प्रमोद भायदे, शहरप्रमुख आदेश दांडेकर यांच्यासह विष्णू पाटील, संजय कदम, विजय गिदी, मनोहर बैले, अजगर दळवी, नौशाद शाबान, मुकरीब खतीब, वामन चुनेकर, अस्लम हलडे, नाना गुरव, इस्माईल शेख, आशिष दिवेकर, आसिफ कोर्लईकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी असगर दळवी, विजय गिद्दी, वामन चुनेकर, चित्राताई पाटील, अॅड. श्रद्धा ठाकूर, अॅड. प्रवीण ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करुन इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार नौशाद दळवी यांनी मानले.
गीते निष्कलंक नेता पंडित पाटील यांनी आपल्या भाषणात अनंत गीते यांच्यासारखा निष्कलंक ज्याच्या चारित्र्यावर एकही डाग नसलेला नेता संपूर्ण देशात नसल्याचे सांगितले आहे. गेल्या निवडणुकीला आमच्याकडून चूक झाली, ती चूक आम्ही सुधारणार आहोत व अनंत गीतेंना निवडून देणार आहोत, असे जाहीरपणे सांगितले. शेकापच्या मतदारांनी अनंत गीतेंनाच मतदान करा, असे आवाहनही पाटील यांनी केले.