अनंत गीते नाम साधर्म्य असणारे दोघे निवडणूकीच्या रिंगणात
। रायगड । खास प्रतिनिधी ।
लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या सोमवारी दुसऱ्या दिवशी पाच उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. इंडिया आघाडीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अनंत गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यातील विशेष बाब म्हणजे अनंत गीते नाम साधर्म्य असणाऱ्या अन्य दोन जणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ओरीजनल अनंत गीते यांची मशाल निशाणी मतदारांच्या मनामनामध्ये कोरली आहे. त्यामुळे डमी उमेदवाराची खेळी यशस्वी होणार नसल्याचे दिसून येते. मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात रायगड लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. 12 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती, मात्र पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. 16 जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून 24 उमेदवारी अर्ज खरेदी केले होते.
रायगड लोकसभा मतदार संघामध्ये इंडिया आघाडीचे शिवसेना (ठाकरे गट) अनंत गंगाराम गीते आणि महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सुनील तटकरे यांच्यामध्येच खरी लढत होणार आहे. दोन्ही प्रतिस्पर्धी तिसऱ्यांदा आमने-सामने येत आहेत. 2014 साली अनंत गीते, तर 2019 साली तटकरे विजयी झाले होते. आता 2014 ची पुनरावृत्ती करण्यासाठी गीते सरसावले आहेत. त्यांना शेकापने पाठींबा दिला आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे मानला जात आहे.
गीते यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. गीतेंच्या डोक्यावर शेकापने हात ठेवला आहे. त्यामुळे विरोधकांच्या तंबूत घबराट पसरली आहे. अनंत गीते यांच्या नावाचा फायदा घेण्यासाठी दोन अपक्ष अनंत गीते नावाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, ओरीजनल गीते यांची निशाणी मशाल आहे. मशाल ही रायगड लोकसभा मतदार संघातील मतदारांमध्ये पोचली आहे. त्यामुळे नाम साधर्म्याचा फायदा कोणत्याही उमेदवाराला मिळणार नसल्याचे बोलले जाते.
अनंत बाळोजी गिते (अपक्ष, 1अर्ज), अनंत पद्मा गिते (अपक्ष, 1अर्ज), अनंत गंगाराम गिते (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, 1+3 अर्ज), नितीन जगन्नाथ मयेकर अपक्ष (1अर्ज), आस्वाद जयदास पाटील (अपक्ष 1अर्ज) दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली.