| आगरदांडा | प्रतिनिधी |
भारत निवडणूक आयोगाच्या निर्दशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधन करणे व निवडणुकांमध्ये निर्भयपणे कोणत्याही प्रलोभनाच्या प्रभावाखाली न येता मतदान करणे या दृष्टीने स्वीप अंतर्गत शहरभर हस्ताक्षर व शपथ अभियान राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने शहरात विविध ठिकाणी जनजागृतीचे बॅनर लावण्यात आले असून नागरिकांना मतदार शपथ देण्यासाठी व हस्ताक्षर घेण्यासाठी शहरातील मतदान बुथ, मुख्य चौक, बाजारपेठ, शासकीय कार्यालय, शाळा, आदिंसह ठिकाणी फिरविण्यात येत आहेत. मोहिमेची सुरुवात नगरपरिषद कार्यालय येथून नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे यांचे हस्ताक्षर करण्यात आली. नागरिकांनी येणाऱ्या निवडणुकीत उत्स्फूर्तपणे व निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा व योग्य उमेदवारास निवडून देऊन देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे यांनी केले.
याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी परेश कुंभार, राकेश पाटील, मनोज पुलेकर, कपील वेहले, सतेज निमकर, पल्लवी डोंगरीकर, सुदेश माळी, दिप्ती एरंडे, अभिजीत चांदोरकर, नगरपरिषद सर्व कर्मचारी, शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.