| पुणे | वृत्तसंस्था |
पुण्याच्या भोरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोरमध्ये बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेल्या एका वृद्ध व्यक्तीचा बैलाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बैलाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
रामनवमी आणि जनाई देवी यात्रा उत्सवानिमित्त भोरमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी विष्णू गेनबा भोमे (वय 70) हे भोर येथे आले होते. भोमे हे शिंद गावातील रहिवासी असून त्यांना बैलगाडा शर्यतीची मोठी आवड होती. दरम्यान, बैलगाडा शर्यत सुरू असताना अचानक बैल उधळून भोमे यांच्या दिशेने आला. त्यांना जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली, त्यांनतर स्थानिकांनी त्यांना भोर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी भोमे यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना भोमे यांचा मृत्यू झाला.