दोन्ही चालक जखमी, मांडवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
सारळ येथे भरधाव दुचाकीने रिक्षाला ठोकर मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह रिक्षा चालक जखमी झाला. अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 9 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सारळ आदिवासीवाडी येथील इसम दुचाकी चालविण्याचा कोणताही परवाना नसताना व वाहनाचे कोणतेही कागदपत्र जवळ न बाळगता रेवस ते सारळ रोडने सारळकडे जात होता.
सारळ गावचे हद्दीतील रस्त्यावर आला असता समोरून येणार्या रिक्षाला त्याने ठोकर दिली. या अपघातात रिक्षा चालक (रा.दत्तपाडा ता.अलिबाग) तसेच दुचाकीस्वार जखमी झाला. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान देखील झाले. सदर अपघात झाल्यानंतर त्याची खबर न देताच दुचाकीस्वार पळुन गेला. याबाबत मांडवा सागरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक चव्हाण हे करीत आहेत.







