| रायगड/अलिबाग | प्रतिनिधी |
देशासह परदेशातील नेत्यांना भारतामध्ये मोदींच्या रुपाने हुकूमशाही येण्याची चिंता वाटत आहे. मात्र, डॉ. बाबासाहेबांनी आपल्या देशाला दिलेली घटना एवढी भक्कम आहे की, तसे धाडस कोणी करणार नाही. हुकूमशाही प्रवृत्तीला गाडून टाकण्यासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
इंडिया आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी मोर्बे येथे मंगळवारी (दि. 23) भव्य सभा पार पडली. त्याप्रसंगी शरद पवार बोलत होते. या सभेला रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. विशेष म्हणजे, मुस्लिम समाजातील महिला-पुरुषांचा उल्लेखनीय सहभाग होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, माजी मंत्री सुभाष देसाई, आ. जितेंद्र आव्हाड, आ. भास्कर जाधव, माजी आ. अनिल तटकरे, माजी आमदार पंडित पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, अस्लम राऊत, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, मराठी मुस्लिम सेवा संघाचे अध्यक्ष इम्तियाज पालकर, शेकाप माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे, इम्तियाज वणू, संजय कदम, तानाजी जगताप, विलास सुर्वे शेकाप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) अशा विविध पक्षातील नेतेमंडळी तसेच इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकशाही जेव्हा संकटात आली, तेथे हुकूमशाही अस्तित्वात आली आहे. आपल्या शेजारी बहुतांश राष्ट्रांमध्ये हुकूमशाही राजवट आल्याने ते देश रसातळाला गेले आहेत. मात्र, भारत देशाच्या संविधानाने हुकूमशाही राजवट येण्यापासून रोखले आहे. परंतु, मोंदींना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासारखी राजवट आणायची आहे. त्यांना वेळीच रोखले नाही, तर आपला देश योग्य दिशेला जाणार नाही. याबाबत देशासह परदेशातील नेत्यांना आणि तेथील जनतेला याची भीती वाटत आहे. परंतु, आपण एकसंघ राहून अशा शक्तींना रोखले पाहिजे, असे आवाहन पवार यांनी केले. भाजपाने विविध सरकारी तपास यंत्रणाच्या दहशतीने सरकारे पाडली आहेत. झारखंड, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात डांबून ठेवले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शिक्षण, पाणी, आरोग्य, वीज वितरण, परिवहन या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केले आहे. केजरीवाल मोंदीच्या विरोधात बोलत असल्याने त्यांना तुरुंगात टाकल्याचे पवार यांनी सांगितले.
देशभरात आत सार्वजनिक चिंता व्यक्त केली जात आहे. मोंदींचा आणि भाजपाचा लोकशाही व्यवस्थेवर अजिबात विश्वास नाही. आपले संविधान आज संकटात सापडले आहे. घटना बदलली तर, सर्वांचेच अधिकार उध्दवस्थ होऊन देश संकटाच सापडेल, असा इशारा पवार यांनी दिला. भाजपाने आतापर्यंत धर्म आणि जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यामुळे पुन्हा ते सत्तेत आल्यास देशाच्या हिताचे नाही, असेही त्यांनी सांगितले. आजवर जेवढे प्रधानमंत्री होऊन गेले त्यांनी कधीच सूडाचे राजकारण केले नाही, त्यांच्या काम करण्याच्या पध्दतीची सर मोदींमध्ये नाही. मोंदींना संसदीय कार्यपध्दतीमध्ये अजिबात देशातील जनतेला एकसंघ ठेवण्याची त्यांच्यामध्ये धमक नाही. त्यामुळे पुन्हा देशाची सूत्रं त्यांच्या हातात देणे घातक ठरेल, असे पवार यांनी स्पष्ट केले.
अटल बिहारी वाजपेयी हे नेहमी विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्वास घेत असत. आता मात्र तशी पद्धत राहीि नसल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले. देशाचा निकाल इंडिया आघीडीच्या बाजून द्यायचा असेल, तर अधिक संख्येने मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. देशातील जनतेचा आता मूड बदलेला आहे. जनता मोदी सरकारच्या धोरणांना उबली आहे. त्यामुळे सत्तापरिवर्तन काळाची गरज आहे. अनंत गीते यांच्या रुपाने स्वच्छ चारित्र्याचा, विनम्र, सेवाभावी असणार उमेदवार इंडिया आघाडीने दिला आहे. मतदानाच्या दिवशी मशाल चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी गीतेंना विजयी करा, असे आवाहन पवार यांनी केले.