पेट्रोल महागले, 100 पैकी 87 तरुण बेरोजगार, ऑडिओ क्लिपही ऐकवली
| माढा | प्रतिनिधी |
आज देशाचा कारभार पंतप्रधान मोदी यांच्या हातात आहे. सत्तेत येताना मोदींनी अनेक आश्वासनं दिलं होती. नरेंद्र मोदी 2014 साली पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या 50 दिवसांमध्ये महागाई कमी करु, असे आश्वासन दिले होते. मात्र, आजची परिस्थिती बघता मोदी साहेबांनी एकही शब्द पाळलेला दिसत नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. ते बुधवारी (दि.24) माढा लोकसभा मतदारसंघातील मोडनिंब येथील प्रचारसभेत बोलत होते.
यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांनी दिलेली किती आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण झाली आहेत, याचा हिशेब मांडला. देशातील लोकांना महागाईच्या संकटातून मुक्त करणार, हे मोदींचं पहिलं आश्वासन होतं. आपण शेती करणारे लोक आहोत. एकेकाळी वाहनं कमी होती. पण आता वाहनांची संख्या वाढली आहे. मोटारसायकल असो किंवा चारचाकी असो त्यासाठी पेट्रोलची गरज लागते. 2014 ला मोदी पंतप्रधान झाले तेव्हा ते म्हणाले होते की, पेट्रोलचा दर 50 टक्क्यांनी खाली आणणार. 2014 मध्ये पेट्रोलचा प्रतिलीटर दर 71 रुपये इतका होता. त्यामुळे हा दर 50 रुपयांपर्यंत खाली येईल, असे सामान्य जनतेला वाटले होते. पण आज त्यांची सत्ता येऊन 3650 दिवस झालेत आणि पेट्रोलची प्रतिलीटर किंमत 106 रुपये इतकी आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात गेली, असे शरद पवार यांनी म्हटले.
घरामध्ये स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर लागतो. 2014 मध्ये गॅस सिलिंडरची किंमत 410 रुपये इतकी होती. आज हीच किंमत 1160 रुपयांवर पोहोचली आहे. मग या लोकांवर विश्वास ठेवायचा कसा, असा सवाल शरद पवार यांनी विचारला.
बेरोजगारीची धक्कादायक आकडेवारी शरद पवार यांनी या प्रचारसभेत देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर भाष्य केले. पंतप्रधान मोदींनी 2014 मध्ये सांगितलं होतं की, देशातील सर्व बेकारी घालवून सगळ्यांच्या हाताला काम देऊ. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही संस्था जगभरातील रोजगाराचा अभ्यास करते. या संस्थेने भारतातील रोजगारांचा आढावा घेतला. या अहवालात देशातील 100 लोकांपैकी 87 जण नोकरीविना असल्याची माहिती समोर आली. मग मोदींनी कसली बेकारी घालवली? त्या आश्वासनाचं काय झालं? मोदींना दिलेला शब्द पाळता आलेला नाही. मात्र, आता तेच मोदी ठिकठिकाणी जाऊन काँग्रेसला शिव्या घालत आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले.