| पुणे | प्रतिनिधी |
गेल्या पाच वर्षांत राज्यात घडलेल्या अभूतपूर्व घडामोडींमुळे, दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने प्रचारात रंगत आली आहे. आपल्या भूमिका मतदारराजाला पटवून देताना नेत्यांची, उमेदवारांची दमछाक होताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीत आमनेसामने उभे ठाकलेले पक्ष आता विरोधात उभे आहेत. गेल्या निवडणुकीत सोबत प्रचार केलेले नेते आता एकमेकांवर टीकेचे बाण सोडत आहेत. तर काही ठिकाणी नेमकी उलट परिस्थिती आहे.
महायुतीचे उमेदवार आणि शिंदेसेनेचे खा. श्रीरंग बारणेंनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. सेनेच्या तिकिटावर लढलेल्या बारणेंनी गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांचा दारुण पराभव केला. हा पराभव पार्थ यांचे वडील अजित पवारांच्या जिव्हारी लागला. आता अजित पवार महायुतीत उपमुख्यमंत्री आहेत. गेल्या निवडणुकीत ज्या बारणेंचा विरोध केला, त्यांच्या प्रचारात आता अजित पवार दिसू लागले आहेत. यावरुन आ. रोहित पवारांनी त्यांच्यावर शरसंधान साधला आहे.
आम्ही विचार सोडलेले नाहीत. त्यामुळे आम्ही कालही बारणेंविरोधात लढलो आणि आजही लढत आहोत, असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना लक्ष्य केलं. मागील निवडणुकीत मावळमध्ये मी पार्थसाठी प्रचार केला. पण दुर्दैवानं त्यांचा मोठा पराभव झाला. बारणे विजयी झाले. लेकाचा पराभव करणार्या बारणेंसाठी आता अजित पवार प्रचार करत आहेत. पण मी भाऊ म्हणून पार्थ यांच्या पराभवाचा बदला घेईन, असा निर्धार बोलून दाखवत रोहित यांनी अजित पवारांना टोला लगावला.