| चेन्नई | वृत्तसंस्था |
मार्क स्टॉयनिसने 63 चेंडूंमध्ये नाबाद 124 धावांची संस्मरणीय खेळी साकारताना लखनौ संघाला चेन्नई संघावर सहा विकेट व तीन चेंडू राखून सनसनाटी विजय मिळवून दिला. त्याने आपल्या खेळीत तेरा चौकार व सहा षटकारांचा पाऊस पाडला. लखनौचा हा आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पाचवा विजय ठरला. चेन्नईला चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
चेन्नईकडून लखनौसमोर 211 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. दीपक चहरे क्विंटॉन डी कॉक याला शून्यावरच बाद करीत लखनौला बॅकफूटवर ढकलले. कर्णधार के. एल. राहुलला मोठी खेळी करता आली नाही. मुस्तफिजूर रहमानच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो ॠतुराजकरवी झेलबाद झाला. यानंतर मार्कस स्टॉयनिस व देवदत्त पडिक्कल जोडीने 55 धावांची भागीदारी रचली. ही जोडी धावफलक पुढे नेत होती. मथिशा पथिरानाने स्वत:च्या पहिल्याच षटकात देवदत्तला (13 धावा) त्रिफळाचीत केले व जोडी तोडली.
मार्कस स्टॉयनिस व निकोलस पूरन या जोडीने लखनौच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दोघांनी 70 धावांची शानदार भागीदारी रचली. दोघांच्या झंझावातापुढे चेन्नईचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. मथिशा पथिराना पुन्हा चेन्नईसाठी धावून आला. त्याने निकोलसला 34 धावांवर शार्दुल ठाकूरकरवी झेलबाद केले. त्यानंतर स्टॉयनिसने स्वबळावर लखनौला देदीप्यमान विजय मिळवून दिला. नाबाद 124 धावांची खेळी साकारणाऱ्या स्टॉयनिसला दीपक हुडाने नाबाद 17 धावांची खेळी करीत उत्तम साथ दिली.