| रायगड | वार्ताहर |
लोकसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सुलभ पद्धतीने मतदान करता यावे, यासाठी ‘सक्षम’ अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपच्या माध्यमातून त्यांना मतदान नोंदणीच्या तपशीलापासून ते त्यांच्या मतदान केंद्राची माहिती मिळवण्यासाठी या अॅपची मदत होणार आहे.
तसेच मतदानाच्या वेळी केंद्रावर पोहोचण्यासाठी व्हीलचेअरची मागणीही त्यांना या अॅपच्या माध्यमातून करता येणार आहे.अनेकदा दिव्यांग व्यक्ती किंवा ज्येष्ठ नागरिकांना आजारपणामुळे मतदानासाठी घराबाहेर पडणे टाळतात. त्यामुळे मतदानाच्या संख्येत घट होताना दिसून येते. ही बाब लक्षात घेऊन सरकारने दिव्यांग आणि ज्येष्ठांचा मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी त्यांना ‘सक्षम’ केले आहे. या अॅपमुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना घरबसल्या त्यांच्या मतदान केंद्राची माहिती मिळवता येणार आहे. तसेच त्या अॅपवर नोंदणी केल्यानंतर त्यांना केंद्रावर मतदान करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात 12 हजार 363 दिव्यांग नागरिक तर, 37 हजार 694 हे 85 पेक्षा जास्त वय असणारे मतदार आहेत. त्यांना मतदान नोंदणी किंवा मतदान केंद्र कुठे असेल, हे तपासणेही कठीण होते. त्यांचे हे मत वाया जाऊ नये, यासाठी या अॅपच्या माध्यमातून त्यांना त्यांचे मतदान केंद्र तपासता येणार आहे.
अॅपचा वापर कसा करावा? गुगल प्ले स्टोरवरून ‘सक्षम’ हे अॅप डाऊनलोड करावे. या अॅपवर दिव्यांग मतदारांना नवीन मतदार नोंदणी, अपंग व्यक्ती म्हणून चिन्हांकित करणे, मतदानाचे स्थान बदलण्याची विनंती, दुरुस्त्या करणे, स्थिती ट्रॅक करणे असे विविध कामे करता येणार आहेत. तसेच ज्या मतदारांना मतदान केंद्रावर येऊन मतदान करायचे आहे, त्यांच्यासाठी निवडणुकीच्या दिवशी या अॅपच्या माध्यमातून व्हीलचेअरही उपलब्ध करून देता येणार आहे.