बोटावर मोजण्या इतकेच कार्यकर्ते, अनेक खुर्च्या रिकाम्या
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड लोकसभा मतदार संघातील निवडणूकीचे मतदान येत्या (दि.7) मे रोजी असणार आहे. प्रचार तोफा पाच मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास थंडावल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रचारासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रचाराचा वेग सर्व ठिकाणी वाढला असून प्रचाराचा अंतिम टप्पा संपण्याच्या मार्गावर आहे. महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारानिमित्त मंगळवारी मुरूडसह अलिबाग तालुक्यात सभा घेण्यात आल्या.
सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अलिबागमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सभा आयोजित केली होती. या सभेला कार्यकर्ते मोठ्या संख्येने येतील या आशेने महायुतीने अनेक खुर्च्या मांडल्या होत्या. रात्री आठ नंतर सभेला सुरुवात झाली. अनेकांची भाषणे झाली. मात्र, तटकरेंची ही सभा फेल ठरल्याचे दिसून आले. या सभेमध्ये बोटावर मोजण्या इतकेच कार्यकर्ते सहभागी झाले होते. बाकीच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. तटकरेंच्या या प्रचार सभेला मोजकीची मंडळी उपस्थित असल्याने महायूतीने स्वतःचे हस करून घेतल्याची चर्चा जोरात रंगली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात घेतलेली सभा रस्त्यात असल्याने अनेकांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले.