| माणगाव | वार्ताहर |
क्रिकेट खेळत असताना वाईड बॉलवरून दोन तरुणांत शाब्दिक वाद निर्माण झाला होता. या वादाचा राग मनात धरून आरोपी गणेश खेरटकर याने विनोद बामणे याच्या डोक्यात बॅटने जबर मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विनोद बामणे याचा मृत्यू झाला होता. माणगाव सत्र न्यायालयाने आरोपी गणेश खेरटकर याला दोषी ठरवत जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे; तर मृत तरुणाच्या कुटुंबियांना दीड लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
रोहा तालुक्यातील पिंगळसई गावात काही तरुण 22 जून 2014 रोजी येथील प्राथमिक शाळेच्या पटांगणात क्रिकेट खेळत होते. या दरम्यान विनोद बामणे व गणेश खेरटकर यांच्यात वाईट बॉलवरून वाद झाला होता. आरोपी गणेश खेरटकर याने रागाच्या भरात विनोद बामणे याच्या डोक्यात बॅटने तीन ते चार वेळा मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. रोह्यात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्याला मुंबई येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यानुसार आरोपी गणेश खेरटकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
विनोद बामणे खूनप्रकरणाचा तपास रोहा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांनी केला होता. त्यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकार पक्षातर्फे एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. पुराव्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार गणेश बावकर, वैद्यकीय पुरावा, पंचांच्या साक्षीचा पुरावा सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी ग्राह्य धरून आरोपी गणेश खेरटकर याला विनोद बामणे खूनप्रकरणी दोषी ठरवून त्याला आजन्म कारावासाची (जन्मठेप) शिक्षा ठोठावली.
या शिक्षेबरोबर द्रव्यदंड म्हणून 25 हजार रुपये व मृत तरुणाची पत्नी व तिची मुलगी यांना दीड लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश माणगाव सत्र न्यायालयाने दिले आहेत. फिर्यादीच्यावतीने वकील सतीश म्हात्रे व आरोपी गणेश खेरटकर याच्यावतीने वकील मनोजकुमार शिंदे यांनी काम पाहिले.