। रसायनी । वार्ताहर ।
माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम राज्यातील ग्रामपंचायत यांच्या मार्फत राबविण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे. खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी यांनीही त्यासाठी मेहनत घेतल्याचे प्रत्यक्ष पाहणी करता दिसत आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरण विभागामार्फत नागरी आणि ग्रामीण क्षेत्रासाठी राबविण्यात येणार हा उपक्रम आहे.
यामध्ये स्थानिक नैसर्गिक परिसंस्थाचे जतन व संरक्षण करण्यासाठीच्या विविध उपायांची अंमलबजावणी करणे आणि वातावरणीय बदलांच्या अनुषंगाने राबविण्यात येणार्या पर्यावरण पूरक कृती उपक्रमावर नागरिकांना प्रोत्साहित करुन त्यांचा सहभाग समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या अभियानाची रचना कार्बन सिक्विटेशन हरित करुन उत्सर्जन कमी करणे आणि नागरिकांमध्ये शाश्वत जीवनशैलीचा प्रसार आणि प्रचार करणे या वातावरणीय बदलाच्या तीन महत्त्वाच्या बाबीवर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प सोडला आहे. ग्रुप ग्रामपंचायत तांबटी यांच्या मार्फत माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत अग्नी, वायू, जल, भूमी व आकाश या पाचवर काम सुरु केले आह.
यामध्ये वृक्ष लागवड, घनकचरा व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कापडी पिशव्यांचा वापर, पाणी आडवा पाणी जिरवा, प्रदूषणकारी फटाके यावर बंदी, प्लास्टिक वापर न करणे, सोलरचा वापर, ठिबक सिंचन, शेततळे, तलावातील गाळ काढणे तसेच माझी वसुंधरा अंतर्गत प्लास्टिक बंदी, शाडूच्या मूर्तीचा वापर करणे, गणपती पुजेच्या निर्माल्यापासून कंपोस्ट तयार करणे, तसेच इतर माझी वसुंधरा उपक्रमाचे जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.
यामध्ये ग्रुप ग्रामपंचायत तांबाटीचे सरपंच अविनाश शंकर आमले व ग्रामसेवक प्रशांत पांडुरंग कदम तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी भाग घेऊन कामकाज सुरू केले आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत तांबाटी हद्दीतील शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला, महिला बचत गट, ग्रामस्थ तसेच तरुण-तरुणी यांचेही सहकार्य लाभले.