ना वेळेवर पगार, ना वैद्यकीय सोयी सुविधा
पगाराविनाच कर्मचारी करताहेत सणवार
। पेण । वार्ताहर ।
गेली दोन वर्षे कोरोना संकटाने संपूर्ण जगावर राज्य केले आहे. याच कोरोनामुळे एसटीची आर्थिक संकटात रुतलेली चाके आता काही प्रमाणात बाहेर येऊन पूर्ववत होत आलेली असताना कर्मचार्यांना मात्र पगाराअभावी तसेच वैद्यकीय बिलांच्या अभावी जगायचे कसे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे एसटी कर्मचार्यांना वेतनाअभावी मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
कोरोना काळातील निर्बंधाचा फटका देशातील तसेच राज्यातील उद्योग धंद्यांनादेखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्याचप्रमाणे देशातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या एसटी महामंडळाला देखील कोरोनातील निर्बधाचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. प्रवासी वाहतूक व माल वाहतूक हेच उत्पन्नाचे प्रमुख मार्ग बंद असल्याने एसटीचा आधीच खोलात असलेला गाडा आणखी खोलात गेला असून त्यातच तीन पक्षांचे सरकार असलेल्या राज्य शासनाकडून निधी उपलब्धतेत विलंब होत असल्याचा मोठा परिणाम कर्मचार्यांच्या पगारावरदेखील झाला आहे.
एकीकडे पगार वेळेवर होत नसताना कर्मचार्यांची वैद्यकीय बिलेदेखील रखडली असल्याने कर्मचार्यांचा मनस्ताप आणखी वाढला. त्यातच सध्या सुरू असलेले विविध सण कसे साजरे करावे? हा प्रश्न एसटी कर्मचार्यांपुढे आहे. रायगड विभागातील पेण, महाड, श्रीवर्धन, माणगाव, अलिबाग, मुरूड, कर्जत, रोहा या आठ आगारात 2 हजार 271 कर्मचारी काम करत आहेत. यामध्ये 503 वाहक, 493 चालक असून 19 हे वर्ग दोनचे अधिकारी व 806 प्रशासकीय व कार्यशाळा कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचार्यांचेही वेळेत वेतन मिळेल का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
पगार दोन महिन्यांतून एकदा
एसटीचा मुख्य प्रवासी असलेल्या खेडेगावातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी बराच कालावधी जावा लागला. यामुळे निर्बध शिथील झाले असले तरी हवे तसे उत्पन्न वाढले नसल्याचा परिणाम कामगारांच्या पगारावर होत आहे. दर महिन्याच्या सात तारखेला होणारा पगार देान महिन्यांतून एकदा होऊ लागला आहे.
महामंडळाकडे असलेल्या निधीच्या उपलब्धतेप्रमाणे कर्मचार्यांचे पगार व वैद्यकीय बिले दिली जात आहेत.
अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, रायगड






