। मुंबई । वृत्तसंस्था ।
भाजपा यंदा 400 जागा जिंकली तर यंदाची लोकसभा निवडणूक ही अखेरची असेल, असा दावा विरोधक करत आहेत. तसेच आम्ही ही निवडणूक केवळ देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी लढतोय, असा प्रचारही विरोधक करत आहेत. विरोधकांच्या या प्रचाराचा सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांना फटका बसत असल्याचं वक्तव्य राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते उदय सामंत यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी मान्य केलं आहे की, विरोधकांनी संविधानावरून सुरू केलेल्या प्रचाराचा महाराष्ट्रात महायुतीला फटका बसत आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने अब की बार 400 पार असा नारा दिला आहे. भाजपाप्रणित एनडीएने निवडणुकीत 400 जागा जिंकण्याचं ध्येय डोळ्यांसमोर ठेवलं आहे. भारतात सत्तास्थापन करण्यासाठी केवळ 273 जागांची आवश्यकता असते. मागील दोन्ही निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवलं होतं. 2014 च्या निवडणुकीत भाजपाने 282, तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 302 जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी भाजपाने थेट 400 जागा जिंकण्याचा संकल्प केल्यामुळे विरोधकांकडून भाजपाच्या हेतूंवर संशय व्यक्त केला जात आहे.