। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यात गावागावांत क्रिकेटचा थरार रंगत असून विजेत्या संघांसाठी आयोजकांकडून लाखोंची बक्षिसे लावण्यात येत आहेत. सध्या मे महिन्याची सुट्टी पडल्याने शहरात नोकरीसाठी स्थलांतरित झालेले तरुण सुट्टीसाठी मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी परतले आहेत.यामुळे ग्रामीण भागात सर्वत्र क्रिकेटचे सामने आयोजित केले जात आहेत.
सध्या तालुक्यातील गावागावात, अगदी गल्लीबोळात देखील क्रिकेटच्या प्रीमियर लीग रंगू लागल्या आहेत. या प्रीमियर लीग पक्षाच्या किंवा त्या गावाच्या नावाने तसेच एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ भरविल्या जात आहेत. गावातील सरपंच ते मोठा नेता व पुढारी यासाठी बक्षिसांची रक्कम किंवा पूर्ण स्पर्धेचे आयोजन करतात. या स्पर्धांमुळे गाव खेड्यातील प्रतिभावंत व होतकरू खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ व जोडीला थोडेफार आर्थिक पाठबळ देखील मिळत आहेत. गावागावातील मैदाने किंवा शेतात या स्पर्धा भरविल्या जातात. त्यासाठी मंडप बांधले जातात.सोबत डीजेदेखील लावला जातो. चांगले निवेदक बोलविले जातात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच यासाठी नेमले जातात.तसेच यावेळी मंडप व डेकोरेशन वाले, वडापाववाले, सरबत, पाणीवाले आदी व्यावसायिक व विक्रेत्यांना देखील चांगला धंदा मिळतो. आयोजकांच्या नावाचे व लोगो असलेले विविध टी शर्ट छपाई केली जाते.