पॅरिस ऑलिंपिक निवड चाचणीत यश
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मनू भाकेर व विजयवीर सिद्धू या दोन नेमबाजांनी पॅरिस ऑलिंपिकसाठीच्या निवड चाचणीत यश मिळवले. मनू हिने महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात 42 गुणांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली. मनूने याप्रसंगी विक्रमी गुणसंख्या मिळवली. विजयवीर याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात 34 गुणांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली. ऑलिंपिक पात्रतेसाठी ही अखेरची स्पर्धा होती.
आता 50 मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारच्या पात्रता फेरींना सुरुवात होणार आहे. मनू भाकेर हिने महिलांची 25 मीटर पिस्तूल प्रकारच्या चारही पात्रता फेरी गाजवल्या. तिने दोन पात्रता फेरींमध्ये पहिले स्थान पटकावले. तसेच इतर दोन पात्रता फेरींमध्ये तिने दुसरा क्रमांक मिळवला. तसेच निवडण्यात आलेल्या पाच महिला नेमबाजांमध्ये ती एकुलती एक अशी नेमबाज आहे की, पात्रता प्राथमिक फेरीत 580 गुणांपेक्षा कमी गुण मिळवलेले नाही. मनू हिने चारही प्राथमिक फेरीत 580 पेक्षा जास्त गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे पॅरिस ऑलिंपिकमधील तिचा प्रवेश नक्की समजला जात आहे. अभिज्ञा पाटीलचा दुसरा क्रमांकमनू भाकेर हिने पहिला क्रमांक मिळवला. त्याच 25 मीटर पिस्तूल प्रकारात अभिज्ञा पाटील हिने 35 गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला. सिमरनप्रीत कौर 30 गुणांसह तिसर्या स्थानावर राहिली. इशा सिंग व रिदम सांगवान यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवला.
पुरुषांमध्ये रस्सीखेच
चार पात्रता फेरींमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या नेमबाजांची ऑलिंपिकसाठी निवड केली जाते. महिलांमध्ये मनू भाकेर व इशा सिंग यांनी अप्रतिम कामगिरी करीत जवळपास आपले तिकीट बुक केले आहे; पण पुरुषांमध्ये रस्सीखेच दिसून येत आहे. अनिश याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारातील दोन पात्रता फेरी जिंकल्या असून इतर दोन पात्रता फेर्यांमध्ये तो दुसर्या स्थानावर राहिला आहे. भावेश शेखावत याने एक पात्रता फेरी जिंकली आहे. विजयवीर याने शेवटच्या पात्रता फेरीत विजय मिळवला असून इतर दोन पात्रता फेरींमध्ये तो दुसर्या स्थानी राहिला आहे.
महिला विभागातील निकाल(25 मीटर पिस्तूल) 1) मनू भाकेर- 42 गुण, 2) अभिज्ञा पाटील- 35 गुण, 3) सिमरनप्रीत कौर- 30 गुण पुरुष विभागातील निकाल(25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल) 1) विजयवीर सिद्धू- 34 गुण, 2) अनीश- 30 गुण, 3) आदर्श सिंग- 25 गुण.