। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड आगारातील अवस्था एवढी भयानक असून जुन्या भंगार अवस्थेत असलेल्या एसटीवर आपला डेपो चालत असल्याने प्रवाशांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी आपल्या पदाधिकार्यांसह आगारात जाऊन समस्यांबाबत अनेक प्रश्नाचा भडीमार करुन आगार व्यवस्थापकांची शाळा घेतली. जर सुधारणा होत नसेल तर 2 जुनपासून आगार बंद आंदोलन करु, असा इशारा देण्यात आला असून या संदर्भात आगार व्यवस्थापक राहुल शिंदे यांना निवेदन देण्यात आले. तसेच, याची प्रत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, विभागीय अधिकारी रामवाडी, मुरुड पोलिस निरीक्षक, मुरुड तालुका पत्रकार संघ यांना ही निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर, तुप्ती पाटील-भोसले, महेश कारभारी, दामु खरगावकर, महेंद्र भाटकर, दिव्या सतविडकर, शैलेश वारेकर, देवेन सतविडकर, उत्तम पाटील, अशोक कमाने आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.