| खोपोली | वार्ताहर |
नगरपरिषदेच्या निधीतून सम्राट अशोक नगर येथे लाखो रूपये खर्च करून बांधलेली शौचालयाची इमारत नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाने जमीनदोस्त केली आहे. या घटनेने मनसे चांगलीच आक्रमक झाली असून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केला नाही, तर सोमवारपासून मुख्याधिकारी आणि बांधकाम अधिकार्यांना कार्यालयात बसून देणार नाही, असा इशारा दिला. मुख्याधिकारी यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खोपोली नगरपरिषदेच्या निधीतून सम्राट अशोक नगर वासरंग, माऊंट व्ह्यू सोसाइटी समोर 2019 साली लाखो रूपये खर्च करून 4 शीटचे शौचालय बांधले होते. शेजारील जागेवर मातीभराव सुरू आहे. त्याच्या बाजूलाच शौचालय होते. गुरूवार (दि.23) मे रोजी बुध्द जयंतीची सुट्टी असतानाही बांधकाम विभागाने अंधाराचा फायदा घेत शौचालय जमीनदोस्त केले आहे. धक्कादायक घटनेची माहिती शहरात वार्यासारखी पसरली. मनसेने आक्रमक पवित्रा घेत, नगर पालिकेचे कार्यालय गाठले. नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील कार्यालयात नसल्यामुळे दूरध्वनीवरून संपर्क केला मात्र उचलला नसल्यामुळे बांधकाम अभियंता अनिल वाणी यांची भेट घेतली. यावेळी माजी नगरसेवक तुकाराम साबळे, महादू जाधव, मनसेचे शहर अध्यक्ष विश्वास (बाळा) दर्गे, शहर संघटक सतीश येरूणकर, वासरंग ग्रामस्थ निखील सुर्वे प्रमोद वेदक, जयेष सुर्वे, आपचे उपाध्यक्ष शिवा शिवचरन, वंचित शाखा अध्यक्ष बाळा राजगुरू आदी उपस्थित होते. मनसेचे शहर अध्यक्ष विश्वास (बाळा) दर्गे, शहर संघटक सतीश येरूणकर यांनी आक्रामक पवित्रा घेत जाब विचारला असता बांधकाम अभियंता वाणी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केला नाही तर सोमवारी मनसे स्टाईलने आंदोलन करीत मुख्याधिकारी आणि बांधकाम अधिकार्यांना कार्यालयात बसून देणार नाही.