| मुंबई | वृत्तसंस्था |
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वरिष्ठ पुरुष भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. सध्या राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहे. द्रविड यांचा कार्यकाळ जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 नंतर संपणार आहे. याबाबत आता नवीन अपडेट्स समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकासाठी अनेक नावे पुढे येत आहेत. याच दरम्यान, एक महत्वाची माहिती समोर येत आहे. रिकी पाँटिंग, जस्टीन लँगर आणि ॲन्डी फ्लॉवर या तीन दिग्गजांनी भारतीय प्रशिक्षकपदासाठी नकार दिला आहे. 29 मे अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने आता फक्त 5 दिवस शिल्लक राहिले आहेत.
ॲन्डी फ्लॉवर काय म्हणाले? भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याचा आपला कुठलाही विचार नाही, असं बंगळुरुचे प्रशिक्षक ॲन्डी फ्लॉवर यांनी सांगितले. मी अर्ज केला नाही आणि करणार देखील नाही. राष्ट्रीय संघासाठी वर्षातील दहा महिने काम करण्याची आपली इच्छा नाही. सध्या मी माझ्या कामात व्यस्त आहे, असं ॲन्डी फ्लॉवरने सांगितले. रिकी पाँटिंगनेही धुडकावला प्रस्ताव-रिकी पाँटिंग यांनीही भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनण्याचा प्रस्ताव धुडकावला. माझी जीवनशैली फिट नाही, असे त्यांनी कारण दिले. राष्ट्रीय संघाचा वरिष्ठ कोच बनणे पसंत आहे. मात्र, आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या असून, घरीदेखील वेळ देऊ इच्छितो. भारतीय संघासोबत काम करताना तुम्ही आयपीएल संघासोबत जुळू शकत नाही, हे प्रत्येकाला माहीत आहे, असं पाँटिंग म्हणाला. दिल्ली संघाचे सात वर्षे प्रशिक्षक असलेले पॉटिंग हे ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघाचे अंतरिम प्रशिक्षक राहिले आहेत. जस्टीन लँगर काय म्हणाले? भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद ही क्रिकेट विश्वातील बहुधा सर्वात मोठी जबाबदारी आहे. वर्षभर भरपूर क्रिकेट असते आणि लोकांच्या अपेक्षाही खूप असतात. हे एक मोठे आव्हान असेल, पण ते मजेदारही असेल आणि आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची उत्तम संधी असेल. परंतु या सर्व गोष्टींसोबतच वेळही योग्य असायला हवी.
चार वर्षे मी ऑस्ट्रेलियन संघासोबत मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. हे खूप व्यापक आणि थकवणारे काम आहे. भारतीय संघावर विजयासाठी खूप दबाव आहे, असं लँगर यांनी सांगितले. लँगर यांनी आयपीएलची विश्वचषकाशी तुलना करून त्याचे कौतुक केले आणि जगातील सर्वोत्तम देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा असल्याचे सांगितले. या मोसमात खराब कामगिरी करूनही लखनौ सुपर जायंट्स स्पर्धेतून बाहेर पडल्याबद्दल त्याने खंत व्यक्त केली. बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता आणि अटी निश्चित केल्या आहेत आणि त्या पुढीलप्रमाणे आहेत–किमान 30 कसोटी किंवा 50 एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव असावा.
- किमान दोन वर्षे पूर्ण सदस्य चाचणी खेळणाऱ्या देशाचे मुख्य प्रशिक्षक असले पाहिजेत.
- किमान 3 वर्षे आयपीएल संघ किंवा त्याच्या समकक्ष आंतरराष्ट्रीय लीग किंवा प्रथम श्रेणी संघ किंवा राष्ट्रीय अ संघाचे सहयोगी सदस्य किंवा मुख्य प्रशिक्षक असणे आवश्यक आहे.
- वय 60 वर्षांपेक्षा कमी असावे.