| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या पर्यटन स्थळी पर्यटक हे मौजमजा करण्यासाठी येत असतात. हे पर्यटन स्थळ शासनाच्या जमिनीवर वसलेले असल्याने येणाऱ्या पर्यटकांकडून माथेरान नगरपरिषद स्वच्छता कर वसूल करते. मात्र, त्या बदल्यात पर्यटकांना सोयीसुविधा पुरविण्यात माथेरान नगरपरिषद कमी पडत आहे. याकडे पालिका दुर्लक्ष करीत असल्याबद्दल समाज माध्यमांवर माथेरान नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
माथेरान हे मुंबईपासून सर्वात जवळचे आणि शासनाची मालकी असलेले एकमेव पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे पर्यटक या ठिकाणी येण्यासाठी पसंती देत असतात. पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून असलेल्या माथेरान शहरात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांकडून स्वच्छता कर आकारत असते. त्याबदल्यात येथील पर्यटनाचा आनंद घेण्याची मुभा पर्यटकांना जशी आहे तशीच पर्यटकांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देखील माथेरान नगरपरिषदेची आहे. मात्र, मोडके तोडके सार्वजनिक सौचालय, पॉईंट वर पाण्याची सुविधा नाही, पर्यटकांना माहिती देणारे गाईड नाही अशी अवस्था माथेरान येथे आहे. त्यामुळे स्वच्छता प्रवेश कर घेणाऱ्या माथेरान नगरपरिषदेला पर्यटकांना सुविधा उपलब्ध होतात किंवा नाही याचे कोणतेही सोयरसुतक नाही. त्यामुळे माथेरान नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी पालिकेच्या कारभाराबद्दल थेट नाराजी व्यक्त केली आहे.