मंगळवारी सकाळी होणार मतमोजणीला सुरुवात
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड लोकसभा मतदार संघातील मतमोजणी मंगळवारी (दि.4) सकाळी आठ वाजल्यापासून सुरु होणार आहे. त्यानिमित्ताने नेहुली येथील जिल्हा क्रिडा संकुलातील मतमोजणी केंद्राची पाहणी शुक्रवारी केली. यावेळी त्यांनी तेथील सोयी सुविधांची माहिती घेऊन संबंधितांना काही सुचनाही केल्या.
यावेळी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, महेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे.ई. सुखदेवे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मतमोजणी शांततेत व सुरळीत पार पाडावी यासाठी केंद्रामध्ये उभारण्यात आलेले वेगवेगळे कक्ष, सोयीसुविधांची उभारणी, उमेदवारांसाठी व्यवस्था, माध्यम कक्ष, मतमोजणी पथके यांची पाहणी केली. तसेच केलेल्या तयारीचा आढावा घेतला.
मतमोजणी केंद्राच्या परिसरात गर्दी होऊ नये यासाठी वाहन तळांचीदेखील व्यवस्था केली आहे. त्यानुसार वाहनतळांची जागा निश्चिती, वाहतूक वळविण्याबाबत चर्चा करण्यात आली. मतमोजणीच्यादरम्यान कोणताही त्रास होणार नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी सुरक्षेबाबतही पाहणी करीत त्यावर चर्चा करण्यात आली. मतमोजणी शांततेत आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पार पडेल, याची दक्षता घ्यावी, आवश्यक सुविधांची तातडीने व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी दिल्या.