। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानच्या वैभवशाली प्रवास पुन्हा एकदा पर्यटकांना अनुभव घेता यावा यासाठी मध्य रेल्वेने पुढाकार घेतला आहे. माथेरानची राणी असा लौकिक असलेल्या मिनी ट्रेनला वाफेच्या इंजिनचा साज चढवण्यात आला आहे. नुकतीच इंजिनाची यशस्वी झाले असून लवकरच ते प्रवाशांच्या दिमतीला येण्याची शक्यता आहे. वर्षभरात देश-विदेशातील लाखो पर्यटक माथेरानला भेट देतात. याठिकाणी धावणारी मिनी ट्रेन नॅरोगेज मार्गावर चालवली जाते. नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे बांधकाम 1904 मध्ये सुरू झाले आणि 1907 मध्ये ही नॅरोगेज लाईन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.
अतिवृष्टीत दरड कोसळण्याचा धोका असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा रेल्वे मार्ग बंद केला जातो. परंतु अमनलॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा पावसाळ्यात सुरू असते. नेरळ-माथेरान येथे चालविण्यात येणार्या मिनी ट्रेनचे इंजिन डिझेलवर चालते.याच इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणार्या इंजिनचा लूक देऊन या नॅरो गेज रेल्वेच्या गौरवशाली भूतकाळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य रेल्वेने एक पाऊल पुढे टाकले आहे. मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेतील अभियंते आणि तंत्रज्ञांचे विशेष पथक तयार करण्यात येऊन त्यांनी वाफेच्या इंजिनाचे मॉडेल तयार केले.जेणेकरून इंजिन सुरळीत चालावे आणि त्याचे ऐतिहासिक सौंदर्य अबाधित राखता यावे. हेरिटेज लूक देण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक तांत्रिक प्रक्रियांचा समावेश असून यात सध्याच्या इंजिनचे हुड काढून टाकणे, हुडसारख्या नवीन ऐतिहासिक वाफेवर चालणार्या इंजिनचे उत्पादन आणि फिटिंग, सध्याच्या डिझेल इंजिनमध्ये बदल करणे, वाफेचे फिटिंग आणि ध्वनी प्रणाली आणि नवीन ऐतिहासिक हुडसह इंजिनचे पेंटिंग आणि आवश्यकतेनुसार स्टिकर्ससह सजावट करणे आदींचा समावेश करण्यात आला आहे. इंजिनमधून वाफेच्या इंजिनसारखा धूर येत असून त्याला बसवलेली शिट्टी हे याचे मुख्य आकर्षण आहे. इंजिनचे शेवटचे काम नेरळ लोकोशेड येथून पूर्ण करण्यात आले.
इंजिनची चाचणी घेण्यात आली. सकाळी साडे सातच्या सुमारास हे इंजिन नेरळ रेल्वे स्थानकातून माथेरानच्या दिशेला धावले. इंजिनला मालवाहू डबे जोडण्यात आले होते. नेरळ ते माथेरान आणि माथेरान ते नेरळ पहिल्या चाचणी परीक्षेचा टप्पा यशस्वीरीत्या पार केल्याची माहिती माथेरान रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. आता मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकार्यांकडून चाचणी घेण्यात येईल. त्यानंतरच याला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.